अनेक उपाय राबवूनही दिल्लीची हवा प्रदूषितच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजधानी दिल्लीतील दम घोटवणारी प्रदूषित हवा शुद्ध व्हावी यासाठी अनेक उपाय राबवूनही दिल्लीच्या हवामानातील सुधारणा झालेली नाही. केंद्र आणि राज्य प्रशासनाने हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठीचे अनेक उपाय राबवूनही दिल्लीच्या हवेची स्थिती जैसे थे असल्याने प्रशासन ऐन दिवाळीत मोठय़ा चिंतेत सापडले आहे. राजधानी दिल्लीतील सर्वसाधारण हवेचा गुणात्मक निर्देशांक 368 म्हणजेच अगदी अशुद्ध अशा प्रवर्गात मोडत असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे. कचरा जाळण्याच्या प्रकारांत आता 30 टक्के घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.

दिल्लीची हवा ‘गेल’ बदलणार
राजधानी नवी दिल्लीसह देशभरातील वायुप्रदूषणाने प्रतिवर्षी होणारे हजारो मृत्यू रोखण्यासाठी आता ‘गेल इंडिया लिमिटेड’ या सरकारी नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादक कंपनीने दिल्लीतील भीषण वायू प्रदूषणविरुद्ध जनजागृतीसाठी ‘हवा बदलो’ मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. या जनजागरण मोहिमेचा प्रारंभ हवा बदलो अँथेम या संगीत व्हिडीओच्या प्रकाशनाने झाला. हर्षदीप कौर आणि जावेद अली यांनी या व्हिडीओसाठी गाणे गायले आहे. तर त्याची निर्मिती डिजिटल स्टार्सचे अमोल पराशर आणि सारा हाश्मी यांनी केली आहे.