
राणा भीमदेवी थाटात राज्यातील ‘ईडी’ सरकारने दिवाळीसाठी सामान्य नागरिकांना 100 रुपयांत एक किलो साखर, रवा, चणाडाळ आणि एक लिटर पामतेल रेशनच्या माध्यमातून देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, अवघ्या तीन-चार दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली असूनही कोल्हापूर जिह्यातील एकाही स्वस्त धान्य दुकानात हे साहित्य पोहोचलेले नाही. त्यामुळे हे साहित्य सामान्यांना दिवाळीनंतरच मिळण्याची शक्यता स्वस्त धान्य दुकानदारांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अंत्योदय अन्न व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना तांदूळ आणि गव्हाचे वाटप सुरू करण्यात आले असून, दिवाळीच्या तोंडावर त्यासाठी रेशन दुकानात रांगा लागल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षांनंतर निर्बंध शिथिल करण्यात आल्याने यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव सर्वत्र मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. आता सर्वत्र दिवाळीची लगबग सुरू आहे. दोन आठवडय़ांपूर्वी राज्यातील ‘ईडी’ सरकारकडून दिवाळी सणासाठी अन्नधान्याव्यतिरिक्त अवघ्या 100 रुपयांत प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ, तसेच एक लिटर पामतेल अशा चार शिधावस्तू रेशन दुकानातून देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर जिह्यातील पाच लाख 61 हजार 686 रेशन कार्ड लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्हा पुरवठा विभागामार्फत हे रेशनिंगचे पॅकेज जिह्यातील सर्व रेशन दुकानदारांना देण्यात येणार आहे. मात्र, अजूनही याचे वाटप होताना दिसत नाही. आता दिवाळीसाठीचे हे रेशनिंग पॅकेज दिवाळी झाल्यानंतरच मिळेल, अशी शक्यता रेशन दुकानदारांकडून व्यक्त होत आहे.
‘‘राज्य शासनाने यंदा दिवाळी सणासाठी 100 रुपयांत प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ, तसेच एक लिटर पामतेल अशा चार शिधावस्तू रेशन दुकानातून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार यातील एक-एक धान्याचा, तेलाचा साठा तालुक्यातील गोडाऊनमध्ये येऊ लागला आहे. लवकरच या चार वस्तू एकत्रित करून सर्व रेशन दुकानांतून संबंधित लाभार्थी रेशन कार्डधारकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.’’
– दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर.



























































