धरमशालातील विजयानंतर टीम इंडियावर एका गोष्टीची बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रिकेट संघानं वर्ल्ड कपमध्ये एका पाठोपाठ एक असे सलग पाच विजय मिळवले आहेत. हिंदुस्थानच्या संघानं पाचही सामन्यात तगडी खेळी करत विजय खेचून आणला. फलंदाज आणि गोलंदाज साऱ्यांनीच चांगली कामगिरी बजावली आहे. वर्ल्ड कपच्या टेबलवर हिंदुस्थानचा संघ अव्वल स्थानावर आहे. धरमशालात न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात झालेल्या जबरदस्त विजयांनंतर हिंदुस्थानी खेळाडूंवर आता एका गोष्टीसाठी बंदी आणली आहे.

हिंदुस्थानच्या संघातील खेळाडूंना आता दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. मात्र हे दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते संघ व्यवस्थापनाकडून एका गोष्टीची बंदी घालण्यात आली आहे. धरमशाला येथे मोठमोठे डोंगर आहेत आणि त्यावर हिमशिखरे आहेत. डोंगर आणि हिमशिखरांवर ट्रेकिंग करायला अनेकजण येतात. त्यामुळे हिंदुस्थानी खेळाडूंनाही तिथे जाण्याचा मोह होऊ शकतो. त्यामुळे संघ व्यवस्थापनानं आता खेळाडूंच्या ट्रेकिंगवर बंदी घातली आहे. खेळाडूंना दोन दिवस सुट्टी असूनही ट्रेकवर जाता येणार नाही. ट्रेकिंग करताना खेळाडूंना दुखापतही होऊ शकते. त्यामुळे दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली असली तरी त्यांच्या ट्रेकिंगवर मात्र बंदी घालण्यात आली आहे. संघ व्यवस्थापनानं घेतलेला हा निर्णय चांगला असल्याची चर्चा आहे.