कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीला बेडय़ा

कुख्यात गँगस्टर छोटा राजन, अबू सालेम, रवी पुजारी यांच्यानंतर आता गँगस्टर प्रसाद पुजारी  गजाआड झाला. गेल्या 20 वर्षांत विविध गंभीर गुन्हे करून परदेशात लपून राहणारा व तेथूनही गँग चालविणाऱया प्रसाद पुजारीला अखेर मुंबई गुन्हे शाखेने फरफटत मुंबईत आणले. चीनमधून त्याचे प्रत्यार्पण करण्यात पोलिसांना यश मिळाले.

हत्या, हत्येचा प्रयत्न, ठार मारण्याच्या धमकीसह खंडणीची मागणी यांसारख्या गंभीर गुह्यांची नोंद प्रसाद पुजारी याच्या नावावर विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहे. मूळचा कर्नाटकच्या उडिपीचा असलेला, मात्र वाशी व मग विक्रोळी येथे बस्तान मांडणारा प्रसाद हा एका गुह्यात अटक होऊन 2004 मध्ये जामिनावर बाहेर आला आणि 2005 मध्ये तो हिंदुस्थानबाहेर सटकला. राजकीय नेते,  व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, बॉलीवूड कलावंत यांना खंडणीसाठी धमकावणे, खंडणी न दिल्यास गोळीबार करणे असे गुन्हेगारी कृत्य प्रसाद पुजारी व त्याच्या टोळीकडून घडत होते. परदेशात राहूनही त्याचा उपद्रव काही थांबत नव्हता. त्यामुळे मुंबई पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. तो चीन, हाँगकाँग या देशांमध्ये लपल्याची माहिती मिळाल्यानंतर वर्ष 2012 मध्ये त्याच्याविरोधात पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. दरम्यान, चीनमध्ये तो पकडला गेल्यानंतर त्याचे प्रत्यार्पण करण्यासाठी मुंबई पोलिसांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्याला चीनमधून आज पहाटे मुंबईत आणण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश मिळाले.

विक्रोळी येथे 2019 मध्ये एका राजकीय नेता व व्यावसायिकावर खंडणी न दिल्यामुळे गोळीबार केल्याप्रकरणात खंडणीविरोधी पथकाने त्याला अटक केली. पुजारीला न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. प्रसाद पुजारी हातात आल्याने आता त्याच्याविरोधात दाखल गुह्यांची उकल होईल. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षात त्याच्या विरोधात पाच तर युनिट-7 मध्ये तीन गुह्यांची नोंद असल्याचे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांनी सांगितले.