लक्षवेधक वृत्त – आता एआय मशीन करणार होमवर्क, सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल

शाळेतून घरी आल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्वात जास्त टेन्शन हे होमवर्कचे असते. परंतु, आता ही चिंता मिटणार आहे. कारण, होमवर्क आणि नोट्स तयार करणारी एआय मशीन आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ कॅप्शनमध्ये दावा करण्यात आला आहे की, ही एक एआय बेस्ड मशीन आहे. केरळच्या देवदत्त पीआर नावाच्या एका डिझाइनर, इंजिनिअरने ही मशीन तयार केली आहे. या मशीनमध्ये एक रोबोटिक हात आणि एक कॅमेरा दिला आहे. कॉलेजमधील शेकडो पानांचा लॅब अहवाल लिहून ही एआय मशीन बनवली आहे. यात प्रोग्रामिंग लँग्वेज पायथनचा वापर करण्यात आला आहे. तसेच रोबोटिक, ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली आहे, असे देवदत्त यांनी सांगितले.

चॉकलेटमध्ये सापडले चार दात

मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये एका निवृत्त महिला मुख्याध्यापकाला वाढदिवसानिमित्त मिळालेल्या चॉकलेटमध्ये चार दात सापडल्याची किळसवाणी घटना समोर आली आहे. मायादेवी गुप्ता असे या निवृत्त मुख्याध्यापक महिलेचे नाव आहे. महिलेने चॉकलेट तोडून खायला सुरुवात करताच त्यात चक्क चार दात आढळून आले. महिला मुख्याध्यापकाने याची तक्रार औषध प्रशासनाकडे केली. निवृत्त मुख्याध्यापक महिला सध्या एका ट्रस्टमध्ये फ्रीमध्ये सेवा देत आहेत. या ठिकाणी नेहमी मुलांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी अनेक लोक येत असतात. काही दिवसांपूर्वी एका मुलाच्या वाढदिवसानिमित्त कोणी तरी या महिलेला चॉकलेट गिफ्टमध्ये दिली होती. याची तक्रार करण्यात आली आहे.

‘नवरा माझा नवसाचा-2’ येतोय!

‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाची क्रेझ 19 वर्षांनंतरही कमी झाली नाही. आता याचाच पुढचा भाग म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा-2’ हा चित्रपट येत्या 20 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली. यावेळी चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि अभिनेते अशोक सराफ उपस्थित होते. या चित्रपटाच्या रिलीज डेटचा एक टीझरही सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. पहिल्या चित्रपटात कंडक्टर असलेले अशोक सराफ दुसऱया भागात म्हणजेच नवरा माझा नवसाचा-2 मध्ये रेल्वेतील टीसी झाले आहेत.

जगभरात यूटय़ूब सर्विस डाऊन

मायक्रोसॉफ्टची सर्विस जगभरात ठप्प झाल्यानंतर आता जगातील अनेक ठिकाणी यूटयूब डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. यूटयूब डाऊन झाल्याची तक्रार अनेकांनी केली असून यूजर्संना व्हिडीओ अपलोड करण्यात अडचण येत आहेत. 33 टक्के यूजर्संना सध्या केवळ अपलोडिंग करण्यात अडचण येत आहे. तर 23 टक्के वेबसाईड युजर्संना विडीओ अपलोडकरण्यात अडचण येत आहे. यूटयूब स्टूडिओमध्ये ही अडचण आहे. डाऊन डिटेक्टरच्या माहितीनुसार, यूटयूबमध्ये 3 वाजेपासून ही समस्या येत आहे. यूटयूब स्टूडिओला याआधी यूटयूब क्रिएटर स्टूडिओ या नावाने ओळखले जात होते.

8 कंपन्यांचे आयपीओ येणार

आठवडय़ात 8 कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. या कंपन्यांच्या मार्केटमधून 809 कोटी रुपये जोडले जाण्याची शक्यता आहे. यात गुंतवणूकदारांना 13500 रुपये गुंतवणूक करता येईल. यासोबत शेअर बाजारात 8 नव्या कंपन्या लिस्ट होतील. कंपन्यांमध्ये हेल्थ केअर आणि टेक सेक्टर कंपन्यांचा समावेश आहे.