
62 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेत सातारा-सांगली केंद्रातून सांगलीच्या लोकरंगभूमी या संस्थेच्या ‘ओऍसिस’ या नाटकाला प्रथम, सातारा येथील शाहू कला अकादमी या संस्थेच्या ‘नियतीच्या बैलाला’ या नाटकास द्वितीय, तर सांगलीच्या ललित कला व नाटय़ तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या ‘इथर’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली.
या तिन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे सातारा-सांगली केंद्रावरील अन्य निकाल याप्रमाणे ः दिग्दर्शन – प्रथम पारितोषिक महेंद्र अंबवले (नाटक – नियतीच्या बैलाला), द्वितीय पारितोषिक इरफान मुजावर (नाटक – ओऍसिस), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम गणेश (नाटक – ओऍसिस), द्वितीय पारितोषिक शुभांगी जगताप (नाटक – इथर), नेपथ्य – प्रथम पारितोषिक इरफान मुजावर (नाटक – ओऍसिस), द्वितीय पारितोषिक अनिकेत ओहोळ (नाटक – नियतीच्या बैलाला), रंगभूषा – प्रथम पारितोषिक प्रसाद गद्रे (नाटक – कथन-कली), द्वितीय पारितोषिक प्रियंका कुदळे (नाटक – वगसम्राज्ञी), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक रोहित भोसले (नाटक – नियतीच्या बैलाला) व धनश्री गाडगीळ (नाटक – ओऍसिस), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे रवीना गोगावले (नाटक – दार उघडताय घराचं), शुभदा कुलकर्णी (नाटक – सेल्फी), अंकिता दणाणे (नाटक – वगसम्राज्ञी), प्राची गोडबोले (नाटक – सुई धागा), संयुक्ता गोडबोले (नाटक – माझी छकुली), यशोधन मावळणकर (नाटक – ढेकर), रवींद्र डांगे (नाटक – व्युऍझिलोपॉच्टली), समीर दळवी (नाटक – पासवाला), किशोर चव्हाण (नाटक – इथर), परेश पेठे (नाटक – कथन कली)
20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत येथील श्री शाहू कला मंदिर व मिरज, सांगली येथील बालगंधर्व नाटय़गृह येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण 26 नाटय़प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विश्वास पांगारकर, शिवानंद चलवादी आणि डॉ. वासुदेव विष्णुपुरीकर यांनी काम पाहिले.



























































