
ऑलिम्पिकच्या तयारीत मग्न असलेला हिंदुस्थानी बॉक्सर अमित पांघलने रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे सुरू असलेल्या गव्हर्नर्स कप बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. मात्र हिंदुस्थानचे इतर पॉच बॉक्सर सलामीलाच गारद झाले.
जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता व आशियाई स्पर्धेतील चॅम्पियन असलेल्या अमित पांघलने 52 किलो गटात यजमान रशियाच्या तामिर गालानोवचा 5-0 गुणांनी धुव्वा उडवून अंतिम चारमधील स्थान निश्चित केले. अमित पांघलने दमदार खेळाचे प्रदर्शन करीत यजमान खेळाडूला कुठलीच संधी दिली नाही. हरयाणाच्या 25 वर्षीय अमित पांघलने गतवर्षी बॉक्सिंग वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
हिंदुस्थानचे इतर पाच बॉक्सर या स्पर्धेत निष्प्रभ ठरले. सुमित सांगवान (81 किलो), मोहम्मद हसामुद्दीन (57 किलो), नमन तंवर (91 किलो) यांच्यासह टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट बुक केलेले आशीष कुमार (75 किलो) व विनोद तंवर (49) यांनाही पहिल्याच फेरीत पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. विनोदला रशियाच्या इगोर सारेगोरोत्सेव याने चुरशीच्या लढतीत 3-2 असे हरविले, तर सुमितवर उझबेकिस्तानच्या दिशोद रुजमेतोवने 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. नमनला कझाकिस्तानच्या अयाबेक ओरालबे याने 5-0 फरकाने हरवले. आशीषला चुरशीच्या लढतीत यजमान रशियाच्या निकिता कुजमिनकडून 2-3 अशी हार पत्करावी लागली. हसामुद्दीनचाही उझबेकिस्तानच्या मीराजिज मुरजाखलिलोवपुढे निभाव लागला नाही.



























































