
गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणाला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 30 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, 60 हजार रुपये किमतीची दुचाकी असा 90 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
देविदास भिवाजी ढगे (वय 36, रा. ढगे मळा, केतकी, निंबोडी, ता. नगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलीस अंमलदार शिरीष तरटे यांनी फिर्याद दिली आहे.
एक व्यक्ती कल्याण रोडवरील जाधव पेट्रोल पंपासमोर शनिराज मार्बल्स येथे गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हेशोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, संदीप धामणे, दत्तात्रय कोतकर, गौतम सातपुते यांना कारवाईच्या सूचना दिल्या. उपनिरीक्षक सोळुंके यांच्या पथकाने शनिराज मार्बल्सच्या परिसरात सापळा लावून संशयित तरुण दुचाकीवरून तेथे येताच त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या दुचाकीची झडती घेतली असता, पिशवीमध्ये गावठी कट्टा मिळाला. पोलिसांनी ढगे याला ताब्यात घेत अटक केली आहे.




























































