
ऑनलाइनच्या माध्यमातून तसेच विविध आमिषे दाखवून गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. नगर जिल्ह्यात 2021 मध्ये सायबर सेलकडे दाखल झालेल्या साडेबाराशे तक्रार अर्जांपैकी तब्बल 940 जणांची तब्बल 90 लाख ते 1 कोटीच्या रकमेची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
सायबर चोरटय़ांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करा, अनोळखी व्यक्तीने मैत्रीची विनंती पाठविल्यास विनंती स्वीकारू नका, ऑनलाइन व्यवहार करताना खात्री करा, पिन नंबर, एटीएम व क्रेडिट कार्डचे नंबर सांगू नका, असे आवाहन पोलिसांकडून वेळोवेळी करण्यात येते. मात्र, पोलिसांच्या आवाहनाकडे कानाडोळा करत सामान्य नागरिक सायबर चोरांच्या जाळ्यात अडकत आहेत.
गेल्या दहा महिन्यांत नगर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे 1240 तक्रार अर्ज आले आहेत. यात फसवणुकीच्या 934 तक्रारी दाखल झाल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने आमिषे दाखवून तब्बल 90 लाख ते 1 कोटीच्या रकमेचा गंडा या तक्रारदारांना घालण्यात आला असल्याचे समोर आले आहे. सायबर सेलने या तक्रारींची दखल घेत 57 लाख 84 हजार 915 रुपये परत मिळवून दिले आहेत.
सध्या दिवाळी सणाच्या काळात विविध ऑनलाइन साइट्सवरून ऑफर्सचा धुमाकूळ सुरू आहे. विविध आमिषे नागरिकांना दाखविली जात आहेत. वाढत्या डिजिटलायझेशनमुळे व ऑनलाइन शॉपिंग साइटवरील ऑफर्समुळे अनेकजण खात्री न करताच ऑनलाइन व्यवहार करत आहेत. त्यातून अनेकांची फसवणूक होत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत.
अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. बँक खात्याची माहिती तसेच गोपनीय पिन क्रमांक आणि ओटीपी शेअर करू नये. फोनवर पैसे पाठवणार असल्याचे सांगून एखादी लिंक आल्यास त्या लिंकच्या खाली ‘पेटू’ आहे कि ‘रिसिव्ह’ आहे, हे तपासूनच लिंकवर क्लिक करावी. अन्यथा आपल्या खात्यावरील पैसे चोरीला जाऊ शकतात. असे प्रकार झाल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क करावा.
– प्रतीक कोळी, पोलीस उपनिरीक्षक, सायबर सेल.





























































