आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू; आंदोलन चिघळणार! ‘दिल्ली चलो’ची पुढील दिशा आज ठरवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतमालाला किमान हमीभाव आणि विविध मागण्यांसाठी गेल्या 15 दिवसांपासून खनौरी आणि शंभू बॉर्डरवर ठाण मांडून बसलेल्या आणखी एका शेतकऱयाला सोमवारी रात्री उशिरा जीव गमवावा लागला. अश्रुधुराच्या नळकांडय़ा, पाण्याचा मारा, रबरी गोळ्यांचा वर्षावर, लाठीचार्ज, गोळीबार झेलूनही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मोदी सरकारच्या दडपशाहीचा खंबीरपणे सामना करत आहेत. आतापर्यंत सहा शेतकऱयांचा मृत्यू झाल्याने हे आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, दिल्ली चलो मोर्चाची पुढील दिशा उद्या बुधवारी होणाऱया बैठकीत ठरवणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले.

सातत्याने अश्रुधुराचा मारा, पाण्याचा फवारा यामुळे सोमवारी कर्नेल सिंग (50) यांची प्रकृती खालावली. त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना तातडीने पटीयालातील राजिंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले. कर्नेल सिंग यांच्या शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच.एस. रेखी यांनी सांगितले. कर्नेल सिंग यांच्या छातीत दुखत होते तसेच काही दिवसांपासून फुप्फुसातील संसर्गाने ते त्रस्त होते, असे सांगितले जात आहे.