
गुजरातमधील कालूपूरमध्ये 2006 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयित आरोपीला गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी अटक केली आहे. मोहसीन पूनावाला असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुजरात एटीएसने वानवडी पोलिसांच्या मदतीने आरोपीला राहत्या घरातून अटक केली.
बॉम्बस्फोटप्रकरणी मागील 16 वर्ष फरार असलेला अब्दुल गाजी याला गुजरात एटीएसने नुकतीच अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीतून गुजरात एटीएसने पुण्यातून मोहसीन पूनावाला याला अटक केली. बॉम्बस्फोट घडवण्यासाठी गाजी आणि मोहसिन यांनी पाकिस्तानची गुप्तहेर एजन्सी आयएसआयला मदत केली. तसेच देशविघातक कृत्य केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. देशभरातील सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी मोहसीनने पुण्यात अनेक घरे बदलली होती.
मोहसीन खूप कमी वेळा घराबाहेर येत होता. दहशतवादाचे प्रशिक्षण घेण्यासाठी तो पाकिस्तानमध्येही जाऊन आला असल्याचे तपासात उघड झाले आहे. 19 फेब्रुवारी 2006 मध्ये रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्बस्फोटप्र्रकरणी आतापर्यंत 12 आरोपींना अटक केली होती. मोहसीन याप्रकरणी अटक करण्यात आलेला 13 वा आरोपी आहे. त्याशिवाय 10 आरोपींचा अद्याप शोध सुरू आहे. हे सर्व आरोपी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत.
रेल्वे स्थानकावर 2006 साली करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी गुजरात एटीएस पथकाने सोमवारी वानवडीतून एकाला अटक केली आहे. त्यासाठी पथकाने स्थानिक पोलिसांची मदत घेतली.
– नम्रता पाटील, पोलीस उपायुक्त, पुणे



























































