13 विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील 13 अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतेने होणार आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात 1 मेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले असून ऑफलाइन परीक्षांचे आयोजन विद्यार्थी, शिक्षकांच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरणार असल्याने राज्य सरकारने पदवी परीक्षांसंदर्भात निर्णय जाहीर केला आहे. उद्यापासून राज्यातील सर्व विद्यापीठांतील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहेत.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी ऑनलाइन परीक्षांबाबतचा निर्णय जाहीर केला. यासंदर्भात सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत उदय सामंत यांची बैठक पार पडली. पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व वर्षाच्या, सर्व सेमिस्टरच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहेत. तशा सूचना सर्व विद्यापीठांना देण्यात आल्या असून या परीक्षा घेताना तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाहीत, तसेच कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी कुलगुरू, संस्थाचालकांनी घ्यावी, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने सूचित करण्यात आले आहे.

विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन सुरू होत्या. पण आता कोरोनाच्या नव्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा देणे कठीण होणार आहे. त्यामुळे यापुढील सर्व परीक्षा ऑनलाइन होतील. या परीक्षांचा निकाल वेळेत लागावा यासाठी उच्च शिक्षण विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत गणला जावा, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करणार आहोत. तसेच राज्यातील 37 लाख कॉलेज विद्यार्थ्यांचे लसीकरण विद्यापीठांमार्फत करण्याचा आमचा विचार आहे.
-उदय सामंत,  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री