
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
दिल्लीसह अनेक राज्यात प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याचाच गैरफायदा घेत काही देशी विदेशी कंपन्यांनी चक्क ‘बाटलीबंद शुद्ध हवाच विकायला सुरूवात केली आहे. फ्रेश एअरच्या नावाखाली अनेकजण ही शु्द्ध हवा ऑनलाईनही विकत आहेत. Auzair नावाच्या एका ऑस्ट्रेलियन कंपनीने दिल्लीत शुद्ध हवा विकण्यास सुरूवात केली आहे.

या कंपनीच्या मते आधुनिक तंत्र वापरून शुद्ध केलेली हवा Auzair मध्ये उपलब्ध आहे. ज्याचा विशेष फायदा सामान्य नागरिकांबरोबरच दम्याचे रुग्ण, खेळाडू, नाक कान व घशाचे विकार असलेले रुग्ण, गिर्यारोहक यांना होणार आहे. कारण यातील Auzair मधील शुद्ध हवेमुळे त्यांना प्रदूषित हवेतही सामान्य जीवन जगता येणार आहे. 15 लीटर शुद्ध हवेसाठी 1999 रुपये आणि 7.5 लीटर हवेसाठी 1499 रुपये नागरिकांना मोजावे लागणार आहे. तर अॅमेझॉन या संकेतस्थळावर Pure Himalayan Air ही कंपनी 550 रुपयात 10 लीटर शुद्ध हवा विकत आहे. शुद्ध हवेच्या बाटलीबरोबर लोकांना एक मास्क देण्यात येणार आहे. ज्यामुळे बाटलीतील शुद्ध हवा नागरिकांना थेट घेता येणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दिल्ली, ग्वाल्हेर,वाराणसी, कानपूरसह जगातील सर्वाधिक 20 प्रदूषित शहरांमधील 14 शहर हिंदुस्थानमध्ये आहेत.
























































