लग्नासाठी सोलापूरची नवरी पोहोचली अमेरिकेला, कुटुंबीयांनी वधूवरांना ऑनलाइन दिले आशीर्वाद

कोरोनाच्या महामारीने थैमान घातल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. लग्नसोहळय़ातील उपस्थितांची संख्यादेखील 50 वरून 25 करण्यात आली आहे. काहींनी तर आपले लग्नसोहळे पुढे ढकलले आहेत. मात्र यातूनही मार्ग काढत सोलापूरची लेक आपल्या लग्नासाठी एकटीच अमेरिकेला पोहोचली आहे. नुकताच तिचा विवाहसोहळा पार पडला असून आईवडिलांनी वधूवरांना येथूनच ऑनलाइन उपस्थित राहून आशीर्वाद दिले आहेत.

ही कहाणी आहे वाडीकुरोली पंढरपूर येथील उत्तम कुंभार यांची कन्या स्मिता आणि कोल्हापूरचे नागेश कुंभार यांचे सुपुत्र अभिषेक यांची. अभिषेक नोकरीनिमित्ताने अमेरिकेत स्थायिक आहे. लॉकडाऊनच्या काळात अभिषेक आणि स्मिता यांनी एकमेकांना ऑनलाइन पद्धतीने पसंत केले. लग्नाचा बस्ता बांधून नऊ महिने झाले. विवाहाचे मुहूर्त टळत गेले, मात्र कोरोनाचा कहर काही कमी होईना. दरम्यान, अभिषेकला नोकरीत प्रमोशन मिळाले, पण त्याला हिंदुस्थानात येण्यासाठी व्हिसा मिळेना. अखेर नवरीला अमेरिकेचा व्हिसा मिळाला अन् ती लग्नासाठी रवाना झाली. 17 एप्रिलला अमेरिकेतील मिशिगन येथील व्यंकटेश्वर मंदिरात स्मिता आणि अभिषेकचा विवाह पार पडला. दोघांच्याही कुटुंबीयांनी ऑनलाइन हजेरी लावत वधूवरांना आशीर्वाद दिले.

आपली प्रतिक्रिया द्या