
संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे, ग्रामपंचायतीच्या महत्त्वपूर्ण ठरलेल्या निवडणुकीत गाव विकास पॅनेलच्या सिद्धिका बोले यांनी केवळ 6 मतांनी विजय प्राप्त करून थेट सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. कोंड असुर्डे ग्रामपंचायत इतिहासात प्रथमच सर्वात तरुण आणि अवघ्या 25 वर्षाच्या उमेदवार म्हणून कुमारी सिद्धिका बोले यांना लोकांनी साथ दिली आहे.
कोंड असुर्डे ग्रामपंचायतीची अतिशय अटीतटीची निवडणूक झाली. या निवडणुकीत गाव विकास पॅनेल उभे करण्यात आले होते. थेट सरपंच पदासाठी सिद्धिका संदीप बोले विरुद्ध सोनाली शिंदे यांच्यात लढत झाली, मात्र या लढतीत सोनाली चंद्रकांत शिंदे यांचा 6 मतांनी पराभव करून सिद्धिका बोले यांनी निसटता विजय प्राप्त केला. कु. सिद्धिका बोले यांना एकूण 270 मते मिळाली, तर सोनाली चंद्रकांत शिंदे यांना 264 मते मिळाली.
तर आंबेड बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी चार जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. रघुनंद भडेकर, अनिरुद्ध मोहिते, शोएब भाटकर आणि सुहास मायंगडे असे उमेदवार रिंगणात उभे होते, मात्र यामध्ये मानसकोंड येथील सुहास मायंगडे यांनी बाजी मारत थेट सरपंचपदाची माळ गळ्यात पडली आहे. मायंगडे यांना 766 मते मिळाली. रघुनंद भडेकर यांना 335 मते, अनिरुद्ध मोहिते यांना 175 मते, तर शोएब भाटकर यांना 68 मते मिळाली. आंबेड बु. ग्रामपंचायतीच्या सरपंचदासाठी चक्क 23 बाद मतांचा म्हणजे नोटाचा वापर करण्यात आला आहे.
























































