
मुंबई येथे एका पत्रकारपरिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी सरकारवर केलेली टीका म्हणजे घरचा आहेरच असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले.
तसेच दोघांचं काय चाललंय ते काही कळत नाही. दोघांचं काय चाललं ते त्या दोघांनाच माहित असा चिमटा देखील अजित पवारांनी घेतला.
‘मी राज्यातील प्रश्नांच्या संदर्भात अनेकदा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याकडे भेटण्यासाठी वेळ मागतो. फोन केला की दादा वेळ देऊ असं म्हणतात. सकारात्मक बोलतात नकारात्मक बोलत नाहीत पण नंतर वेळ काही देत नाहीत’, असं अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं. ‘ते आम्हाला नुसतं खेळवतात की चालढकल करताहेत की वेळ मारून नेताहेत हे पण कळायला मार्ग नाही’, असंही ते म्हणाले. मी सुद्धा राज्याच्या महत्त्वाच्या पदांवर राहिलो आहे. महत्त्वाच्या लोकांनी वेळ मागितला की वेळ द्यायचा असतो. आता संघटनाही कामगार क्षेत्रातल्या मोठ्या संघटना आहेत. सत्तेवर नसताना सगळ्या गोष्टींवर सकारात्म बोलणं खूप सोपं असतं, पण सरकारमध्ये आल्यानंतर त्या निर्णयाबद्दलचा अंतिम निर्णय घेऊन त्यातून मार्ग काढणं हे म्हणजे तारेवरची कसरत असते, असं अजित पवार यांनी सुनावलं.
गोरगरीबांचं नाही सर्वसामान्यांचं सरकार! अजित पवार यांचा टोला
हे सरकार गोरगरीबांचं सरकार असं म्हणत एका पत्रकारानं प्रश्न विचारताच अजित पवार यांनी त्याला रोखलं आणि हे सरकार गोरगरीबाचं सरकार नाही तर ‘सर्वसामान्यांचं’ सरकार आहे, असा चिमटा घेतला.




























































