
वीज वितरणाच्या सक्तीच्या वसुलीमुळे नगरच्या अकोळनेर येथील शेतकरी पोपट जाधव यांनी आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबांची भेट घेण्यासाठी राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज १ डिसेंबर रोजी नगर तालुक्यात येथे येणार आहेत.
महावितरणाच्या जाचक व पठाणी वसुलीमुळे नगर तालुक्यातील अकोलनेर येथील शेतकरी जाधव यांनी दोन दिवसापूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. या घटनेचे पडसाद नगर शहरासह राज्यात उमटले होते, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले तसेच तालुका अध्यक्ष राजेंद्र भगत यांच्यासह शिवसैनिकांनी आंदोलन करून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. जोपर्यंत महावितरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या समवेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून निश्चितपणे कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते.
घडलेल्या घटने संदर्भात दैनिक सामनातून या पठाणी वसुलीच्या संदर्भात अग्रलेख प्रकाशित झाल्यानंतर त्याचे सर्वत्र पडसाद उमटले, महावितरणाच्या बद्दल तीव्र नाराजी अनेक ठिकाणी व्यक्त करण्यात आली. तर काही ठिकाणी अनेकांनी तक्रारी देण्यास सुरुवात केली आहे.
अकोलनेर येथे जाधव यांनी केलेल्या आत्महत्येनंतर राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे जाधव कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार असून ते नगर तालुक्यातील अकोलनेर येथे दिनांक 1 रोजी येणार आहेत. त्यांच्या समवेत नगरचे नगर अध्यक्ष जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.





























































