
कोरोना महामारीचा फटका सांस्कृतिक क्षेत्राला बसला आहे. मागील 14 महिन्यांपासून कार्यक्रम होत नसल्याने राज्यभरातील लाखो कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत आम्ही जगायचं कसं, असा सवाल कलावंत करत आहेत. राज्य सरकारने अन्य घटकांना जसे आर्थिक पॅकेज जाहीर केले तसे आपल्यालाही मिळावे, अशी मागणी वाद्यवृंद निर्मात्यांनी केली आहे.
मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ व कलानिधी समिती या संस्थेने राज्य सरकारकडे मदतीसाठी गाऱहाणे घातले आहे. कोरोना काळात लोककलावंत, वाद्यवृंद कलावंत, लावणी कलावंत, साऊंड आर्टिस्ट, बॅकस्टेज आर्टिस्ट यांचा रोजगार हिरावला गेला आहे. अनेकांनी साऊंड इक्विपमेंट, वाद्य खरेदी कर्ज काढून केली आहे. त्यांचे घरकर्ज, वाहन कर्ज यांचे बँकांचे हप्ते थकले आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमच होत नसल्यामुळे बँकांचे हप्ते कुठून भरणार, असा सवाल वाद्यवृंद निर्मात्यांनी केला आहे. एप्रिल-मे महिन्यांचे कार्यक्रम म्हणजे पावसाळ्यातील आमची बेगमी असते, मात्र ऐन हंगामात घरी बसण्याची वेळ आलेय. ज्याप्रमाणे कामगार, घरकामगार, फेरीवाले, रिक्षावाले यांना सरकारने मदत केली त्याप्रमाणे आमचाही विचार करण्यात यावा, अशी मागणी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ व कलानिधी समिती, मुंबईचे अध्यक्ष उदय साटम, कार्याध्यक्ष शंकर पिसाळ, प्रमुख कार्यवाह बाळा पांचाळ आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.
मागण्या कोणत्या
मराठी वाद्यवृंद, लावणी व सांस्कृतिक कार्यक्रम यांना प्रयोगानुसार किंवा वार्षिक अनुदान द्यावे. कलाकारांना आपत्कालीन आर्थिक मदत करावी, अशी मागणी वाद्यवृंद निर्मात्यांनी केली आहे. याशिवाय सरकारी योजनांमधून कलाकारांना रोजगार, बँकेचे हप्ते भरण्यासाठी सहा महिन्यांची सवलत, कलाकारांसाठी आर्थिक कलाकार महामंडळ स्थापन करावे, अशा मागण्याही केल्या आहेत.


























































