
राज्यासह धाराशिव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवे उच्चांक स्थापन करत आहे. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली होती, मात्र अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लोक घराबाहेर पडत असून गर्दी करत आहेत.
त्यामुळे धाराशिवचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज एक आदेश काढून वैद्यकीय सेवा वगळून सर्व दुकाने, आस्थापना सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. दिवसाला 600 ते 700 रूग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 5 हजार 430 एवढी झाली आहे तर 667 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. राज्यात कोरोनाचा रुग्णाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली होती. मात्र, नागरिक अत्यावश्यक सेवाच्या नावाखाली बाजारपेठा तसेच इतर ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी करत असल्याचे जिल्हा प्रशासनास निदर्शनास आले आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दवाखाने, रोगनिदान केंद्रे, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालय, औषधालय, औषध कंपन्या इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा आणि त्यांचे उत्पादन व वितरणासाठी सहाय्यक सर्व घटक सोडून इतर अत्यावश्यक सेवांसाठी सकाळी सात ते दुपारी दोन ही वेळ निर्धारित केली आहे. हे आदेश आजपासून दिनांक 1 मे पर्यंत लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱया व्यक्ती, संस्था या दंडास पात्र राहतील असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.


























































