
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
अमेरिकेने पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेन याचा खात्मा केला होता. तसे ‘ऑपरेशन’ पाकिस्तानात घुसून हाफीज सईद याच्या विरोधात करण्याची क्षमता हिंदुस्थानकडे कधीच नव्हती, असे वक्तव्य काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसविरोधात वातावरण तापण्याची शक्यता आहे.
मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱयांचा हिंदुस्थान खात्मा करू शकतो. लादेनच्या विरोधात अमेरिकेने केलेल्या धडाकेबाज कारवाईसारखे ‘ऑपरेशन’ पाकिस्तानात घुसून करण्याची क्षमता हिंदुस्थानमध्ये आहे, असा दावा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केला, मात्र त्यांचा तो दावा चिदंबरम यांनी खोडून काढला आहे.
मुंबईवरील हल्ल्यानंतर हाफीज सईद हा कराचीत सुरक्षितस्थळी होता. आता तर तो पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरत आहे असे सांगून चिदंबरम म्हणाले की, अमेरिकेने पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये घुसून ओसामा बिन लादेनला कंठस्नान घातले होते. तशी क्षमता आपल्या देशाची नाही. अमेरिकेसारखे ‘ऑपरेशन’ हाफीज सईदविरोधात करण्याचा प्रयत्न हिंदुस्थानने मुंबईवरील हल्ल्यानंतर 2008 सालात केला असता तर आपल्याला अपयश आले असते. शिवाय त्याचा मोठा फटका बसला असता असे त्यांनी सांगितले. 26/11सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा झाला तर चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असा ‘संदेश’ पाकिस्तानला आमच्या यूपीएच्या सरकारने कूटनीतीचा वापर करून दिला होता, असेही चिदंबरम म्हणाले.
पाकिस्तानात घुसून हाफीज सईदचा खात्मा करण्याची क्षमता 2008 सालात आपल्या देशाची नव्हती. तशी क्षमता आता असेल तर माझ्यासाठी तरी ते आश्चर्यकारक आहे.
– पी. चिदंबरम, ज्येष्ठ काँग्रेस नेते
























































