मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात भाताची लावणी, शिवसेनेचे जोरदार आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. या खड्ड्यातून वाहन चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. वारंवार मागणी करूनही मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवले जात नसल्यामुळे आज शिवसेनेने सावर्डे येथे जोरदार आंदोलन छेडले. मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्येच भाताची लावणी करत शिवसैनिकांनी अनोखे आंदोलन छेडले.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली सावर्डे येथे शिवसैनिकांनी आंदोलन छेडले. आज दुपारी शिवसैनिक भगवे झेंडे आणि हातात भाताची रोपे घेऊन महामार्गावर उतरले. महामार्गावरील साठलेल्या पाण्यात भाताची लावणी करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणा दिल्या. तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे तातडीने भरा अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली. शिवसैनिकांचे आंदोलन सुरु असताना त्याचवेळी रस्त्यावरून उपप्रादेशिक परिवहन विभागाची गाडी जात होती. ही गाडी शिवसैनिकांनी रोखली. यावेळी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी महामार्गावरील खड्ड्यांना उपप्रादेशिक परिवहन विभाग जवाबदार आहे. उपपरिवहन प्रादेशिक विभाग वाहनचालकाकडून कर घेते, मग चांगले रस्ते करण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल त्यांनी केला. मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.