
>>मंगेश उदगीरकर
आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.
‘चला! पूजेची वेळ झाली, सोवळे नेसा!’
‘मी धूत वस्त्र घातले आहे, ते पुरेसे आहे!’
‘अहो! सोवळे नेसलेच पाहिजे! शास्त्र तसे सांगते!’
‘ते कळकट वर्षानुवर्षे न धुतलेले कद नेसण्यापेक्षा हे स्वच्छ धुतलेले वस्त्र चांगले, नाही का?’ माझा युक्तिवाद!
‘सोवळे घालावेच लागेल!’ त्यांची ठाम भूमिका!
‘मग पूजा रद्द!’ मी हट्टाला पेटलो.
‘बरं, बरं, असू द्या!’ त्यांची माघार!
हे संवाद माझ्या आणि पद्माकर गुरूंमधले.
1980 साली मी सहवर्तमान सरस्वती नगरात किरायाने दोन खोल्यांमध्ये राहत होतो, त्यावेळी माझ्या शेजारी एक बाळबोध कुटुंब होते. आई-वडील आणि चार मुले असा परिवार होता. वडील भिक्षुकी करायचे आणि संसाराचा गाडा ओढायचे. भगवान, प्रभाकर, पद्माकर आणि सुधाकर अशी गुणी मुले त्यांच्या पदरात पडली होती. अत्यंत आज्ञाधारक. त्यावेळी सगळी शिकत होती. एक पद्माकर सोडला तर बाकीच्या मुलांना नोकऱया मिळाल्या, पण पद्माकरने वडिलांचा वारसा पुढे चालवला. जबरदस्त पाठांतर, खणखणीत आवाज आणि जोडीला प्रामाणिकपणा या बळावर त्याने भिक्षुकीमध्ये आपला जम बसवला. माझ्याशी त्याची दोन नाती जोडलेली होती, एकतर बालपणापासून मी त्याला पाहिलेले असल्यामुळे मी त्याच्यावर थोडा वडीलकीचा अधिकार गाजवू शकत होतो आणि दुसरे म्हणजे ‘गुरू’ म्हणून त्याचे पायही शिवत होतो.
पाच फूट सहाएक इंचाची उंची, डोक्यावरचे उभे राहिलेले बारीक केस, डाव्या उजव्या बाजूने सरळ असलेल्या भुवया, बारीक डोळे, पसरट जिवणी, नेहमीच दाढीच्या खुंटासहित वाढलेल्या आकारहीन मिश्या, सडसडीत तरीही सुदृढ देहबोली. अंगात लांडा गुरू शर्ट, खाली नेसलेले धोतर अशा वेशात पद्माकर अख्ख्या परभणीत संचार करत असतो. सगळ्यांच्या घरात स्वयपाकघरापर्यंत संचार! ‘काय वहिनी ! आज काय बेत?’ इथपासून सगळ्या नातेवाईकांच्या चौकश्या! कुणाचे ‘जमवायचे’ असो की काही कौटुंबिक अडचण असो, वहिनी पद्माकरला खाजगीत सांगणारच!
‘काही काळजी करू नका!’ एवढं बोलून ताटकळत त्रासिक चेहऱयाने उभ्या असणाऱया यजमानाला ‘हां, तुम्ही उभे का राहिलात?’ असे ठणकावून ‘चला, सर्व मंगल मांगल्ये सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके……’ अशी खणखणीत सुरुवात करायचा! मग साग्रसंगीत पूजा आटोपली की, उभयता समाधान पावायचे. श्रावणात तर याच्या पावलांना भिंगरी लागलेली असायची. आमच्या घरच्या सत्यनारायण पूजेला तो भल्या पहाटे सहालाच हजर असायचा. मग आमची धांदल उडायची. हा पण त्या धांदलीत सामील असायचा! ‘जानवे नसेलच!’ असं म्हणून तो मला कानकोंड करून विजयी मुद्रेने खिशातून यज्ञोपवीत काढून हातात ठेवायचा. मी तयार होईपर्यंत त्याने फुलांची सुरेख आरास मांडलेली असायची. मी थोडा कर्मकांडांच्या विरोधात असल्याने वडीलकीचा अधिकार गाजवून सांगायचो, ‘पद्माकर! लवकर आटपायचे!’
तो हसायचा, पण माझा शब्द पाळायचा!
सगळ्या समाजामध्ये त्याने ऋणानुबंध जोपासले आहेत. माझ्या मुलाच्या लग्नात तो जबलपूरपर्यंत टल्ले खात आला होता, यात सर्व आले! तो केवळ पौरोहित्य करणारा नव्हता, तर त्या त्या घरचा सदस्य म्हणून पडेल ती जबाबदारी आपणहून अंगावर घ्यायचा. एवढय़ा घरी त्याचा राबता असूनही त्याने कधीही याचे त्याला सांगितले नाही. हा मोठेपणा त्याला संस्कारांतून मिळाला होता. त्यामुळेच सगळ्या आया, बायाच नव्हे तर कर्ते पुरुषही त्याच्यापाशी मन मोकळे करून टाकत.
शून्यातून सुरुवात केलेला पद्माकर आज सुस्थितीत आहे. स्वतःचे घर, मुलेही व्यवस्थित मार्गी लागली आहेत हे समाधान त्याच्या अंगी लागल्यासारखे वाटते आहे. थोडा जाड झाल्यासारखा वाटतो आहे. आताशा निवृत्तीची भाषा बोलू लागलाय, पण ते त्याला शक्य नाही, कारण सगळ्या समाजात तो इतका खोलवर झिरपून गेला आहे की, ही कुटुंबे त्याचा विरह सहन करू शकणार नाहीत.
त्याला त्याच्या लहानपणापासून पाहतो आहे. हा आता मोठा, जाणता, सर्वमान्य झाला असला तरी तो समोर आला की, मला तो लहानच वाटून जातो. आता मी परभणी सोडली आहे, पण पद्माकरसारखे अनेक बंध मला येथे रमू देत नाहीत. येथे येऊन मला उणीपुरी चार वर्षे झाली असतील, पण इथल्या आठवणींनी मला परभणीशी जखडून टाकले आहे.
पद्माकर गुरू! आतापर्यंत तुम्ही मला आशीर्वाद देत आलात, आज मी तुम्हाला आशीर्वाद देतो आहे, ‘सुखी रहा मित्रा!’



























































