हिंदुस्थानला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे ‘गुरू’ बनले पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक, पीसीबीने दिली अपडेट

पाकिस्तानी क्रिकेट संघाची कामगिरी गेल्या काही काळापासून खालावत चालली आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) एका चांगल्या प्रशिक्षकाच्या शोधात होती. या रेसमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन आणि वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरने सॅम आघाडीवर होते. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत पीसीबीने हिंदुस्थानला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे ‘गुरू’ची पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे.

हिंदुस्थानला तब्बल 27 वर्षानंतर वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या गॅरी कर्स्टन यांची पीसीबीने पाकिस्तानच्या वन डे आणि टी-20 संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यासोबत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीची कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अझर मेहमूद हे कर्स्टन आणि गिलेस्पी यांनी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून मदत करेल.

गॅरी कर्स्टन हे दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू असून हिंदुस्थानचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानने 2011 मध्ये वन डे वर्ल्डकप जिंकला होता. सध्या ते हिंदुस्थानमध्ये असून आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचे मेंटॉर म्हणून कार्य करत आहेत.

दरम्यान,आगामी टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर पीसीबीने क्रिकेटमध्ये दिग्गजांमध्ये गणना होणाऱ्या गॅरी कर्स्टन यांच्याकडे पाकिस्तानच्या वन डे आणि टी-20 संघाचे प्रशिक्षकपद सोपवले आहे. पीसीबीने कर्स्टन आणि गिलेस्पी यांच्यासोबत 2 वर्षांचा करार केला आहे. याचा अर्थ हे दोघांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानचा 2025मध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा खेळेल हे स्पष्ट झाले.