रामेश्वर कॅफेतील स्फोटाचे पाकिस्तान कनेक्शन

बंगळुरूतील प्रसिद्ध रामेश्वर कॅफेमध्ये 1 मार्च 2024 रोजी स्फोट झाला होता. या प्रकरणात एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने या हल्ल्याचा मास्टरमाइंड अब्दुल मतीन ताहा आणि आयईडी बॉम्ब ठेवणारा मुसावीर हुसेन शाजिब यांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली. त्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून कॅफेतील बॉम्बस्फोटाच्या तपासात एक भक्कम पुरावा शोधला आहे. त्यानुसार या स्फोटामागे पाकिस्तान कनेक्शन असल्याचे समोर येत आहे.

दोघांनी त्यांच्या जबाबात कर्नलचा उल्लेख केला होता. त्याच्याविषयीचा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. कर्नल हा मतीन आणि शाजिबचा हँडलर असल्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱयांना मिळाली आहे. त्याचे खरे नाव नसून सांकेतिक शब्दात त्याचा उल्लेख करण्यात आला. 2019-20 मध्ये अल हिंद मॉडय़ूलशी संबंध आल्यानंतर हा कर्नल अब्दुल मतीन ताहा आणि शाजिब यांच्या संपर्कात होता.

 

आतापर्यंतच्या तपासात काय समोर आले

कर्नल दक्षिण हिंदुस्थानातील अनेक तरुणांना क्रिप्टो वॉलेटच्या माध्यमातून निधी पुरवतो. त्यांना धार्मिक स्थळे, हिंदू धर्मगुरू आणि प्रमुख स्थळांवर हल्ले करण्यासाठी प्रेरित करत होता. नोव्हेंबर 2022 मध्ये मंगळुरू ऑटोरिक्षा स्फोटाच्या घटनेनंतर कर्नल नावाच्या हँडलरबद्दल ऐकले होते. तो मध्यपूर्वेत गुप्तपणे काम करतो. तो बहुधा अबुधाबीत आहे, अशी माहिती मिळाल्याचे एका अधिकाऱयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

n कर्नल आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे छोटे मॉडय़ुल तयार करून पुन्हा दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.