
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानच्या सीमेवर तैनात असलेले आपले पायदळ अधिक मजबूत करण्यासाठी पाकिस्तान आणखी 600 रणगाडे सीमेवर तैनात करणार आहे अशी खळबळजनक माहिती हिंदुस्थानी लष्कराचे सूत्र आणि गुप्तचरांनी दिली आहे. हिंदुस्थानच्या सशस्त्र दलाचे अत्याधुनिकरण हे गोगलगाईच्या गतीने होत आहे. दुसरीकडे पाकिस्तानने रशियाकडून टी-90 आणि चीन, युक्रेनकडूनही रणगाडे खरेदी करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. पाकिस्तान खरेदी करणार असलेले हे रणगाडे 3 ते 4 कि.मी. वरील लक्ष्याचा वेध घेणारे आहेत.
आगामी 2025 पर्यंत लष्कराचे अत्याधुनिकरण करण्याची पाकची योजना आहे. या योजनेअंतर्गत चीनकडून तब्बल 220 रणगाडे खरेदी करण्यात येणार आहेत तर 360 रणगाडे हे रशिया, युक्रेन आदी देशांकडून घेण्यात येणार आहेत.
हिंदुस्थानकडे सध्या अर्जुन रणगाडय़ासह टी-90, टी-72 हे रणगाडे आहेत. हे रणगाडे पाकिस्तानकडे असलेल्या रणगाडय़ांपेक्षा अधिक सरस आहेत. मात्र पाकिस्तान आता रशियाकडून टी-90 यासह इतर रणगाडे खरेदी करून हिंदुस्थानशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. पाकिस्तानकडे सध्या चीनचे टी-59, टी-69 हे रणगाडे आहेत.
रणगाड्यांच्या ताफ्यांचे अत्याधुनिकरण चिंताजनक
पाकिस्तानी लष्कर आपल्या सशस्त्र पलटणी, रेजिमेंटचे कालबद्ध पद्धतीचा अवलंब करून अत्याधुनिकरण करीत आहे. मात्र हिंदुस्थानी लष्कराबाबत असे होत नाही असे एका लष्करी तज्ञाने आपले नाव उघड न करता सांगितले. पाकिस्तानी लष्कर आपल्या रणगाडय़ांचा ताफा ज्या पद्धतीने अत्याधुनिक करीत आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असेही त्यांनी सांगितले. हिंदुस्थानकडेही सध्या रणगाडय़ांची एक स्वतंत्र ब्रिगेड आहे. सध्या ती लडाखमध्ये तैनात आहे. मात्र ती पुरेशी नाही, असेही या लष्करीतज्ञाने स्पष्ट केले.
प्रक्रियेतील विलंबामुळे हिंदुस्थानी लष्कराचे अत्याधुनिकरण रखडले
हिंदुस्थानी लष्कराचे अत्याधुनिकरण हे सध्याची असलेली कार्यपद्धती आणि प्रक्रियेमधील विलंबामुळे रखडले आहे. लष्कराच्या अत्याधुनिकरणाबाबत सध्या सरकारच्या उच्चस्तरावर अभ्यास केला जात आहे, असेही लष्कर सूत्रांनी सांगितले. हिंदुस्थानी लष्कराने आपल्या पायदळाच्या सशस्त्र दलाचे अत्याधुनिकरण करण्याचा मेगाप्लॅन तयार केला. अत्याधुनिक लढाऊ वाहने (फूटूरिस्टीक इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल) खरेदी करण्यासह इतर शस्त्रास्त्र खरेदी करण्याची मेगायोजना होती. यासाठी 60 हजार कोटींचा खर्च आहे.
इटलीकडून रायफली घेणार
पाकिस्तानी लष्कर एसपी माईक-10 गन (150 एमएम) या अत्याधुनिक 245 रायफली पाकिस्तानी लष्कर इटलीकडून खरेदी करणार आहे. यापैकी या 120 रायफली पाकिस्तानकडेही पोहचल्या आहेत.




























































