पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ला करावा, इस्रायलच्या अल अक्सा मशिदीतील भाषणात मुस्लिम विचारवंताचे जहरी फुत्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप प्रवक्त्यांच्या प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यावरून पॅलेस्टाईनमध्ये आता निषेधाची आग पेटली आहे. अल अक्सा मशिदीत 10 जून रोजी हिंदूंच्या विरोधात रॅली काढण्यात आली. या रॅलीत हिंदूंविरुद्ध जिहाद पुकारण्याची हाक देण्यात आली आहे.

द मिडल ईस्ट मीडिया रिसर्च इन्स्टिट्यूट (एमईएमआरआय) च्या माहितीनुसार, अल-अक्सा मशिदीतील रॅलीदरम्यान पॅलेस्टिनी इस्लामिक विचारवंत निधाल सियाम यांनी गायींची पूजा करणाऱ्या हिंदूंविरुद्ध जिहाद सुरू करण्याचे आवाहन केले. हिंदुस्थानचा शेजारी देश पाकिस्तानचा उल्लेख करून ते म्हणाले की, पाकिस्तानकडे हिंदूंना धडा शिकवण्यासाठी सक्षम लष्कर आहे.

यावेळी सियाम म्हणाले की, आम्ही अल अक्सा मशिदीतून मुस्लिमांच्या सैन्याला संबोधित करत आहोत. इजिप्त, तुर्कस्तान, जॉर्डन आणि सर्व मुस्लिम देशांमधील मुस्लिमांनो आपण कुठे आहात? तुमचा धर्म आणि मोहम्मद पैगंबर यांना पाठिंबा देण्याची हीच योग्य वेळ नाही का? आपल्या देशांना स्वतंत्र करण्याची हीच योग्य वेळ नाही का? पाकिस्तानच्या लोकांनो, हिंदूंशी लढण्याची जबाबदारी इतर कोणापेक्षाही तुमच्यावर आहे. असे उद्गार काढत या व्हिडिओमध्ये मुस्लिम देशांना हिंदूंच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सियाम म्हणाले ही अमेरिकेने सर्वप्रथम इराक आणि अफगाणिस्तानवर हल्ला केला. यानंतर स्वीडनने मुस्लिम मुलांचे अपहरण केले. फ्रान्सने हल्ला केला. रशियन लोकांनी अनेक वेळा हल्ले केले. त्यानंतर चीनने गुन्हे केले. आता गायींची पूजा करणाऱ्या हिंदूंनी मशिदी उद्ध्वस्त केल्या. त्यांनी मुस्लिमांना मारून त्यांची गावे उद्ध्वस्त केली. पाकिस्तानच्या लोकांनो, तुम्हाला हिंदूंशी लढण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. ते हिंदू तुमच्या सीमेवर आहेत, त्यांनी तुमच्या जमिनीवर कब्जा केला आहे आणि तुमच्या लोकांना मारत आहेत. हिंदूंशी स्पर्धा करण्यासाठी रणांगण उघडण्याची वेळ आली आहे. असे ते म्हणाले.

प्रेषित मोहम्मद यांच्यावर भाजप प्रवक्त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा देशात आणि परदेशात मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. हा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. अनेक देशांमध्ये भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकला जात आहे.