
पणजी विधानसभा अधिवेशनाच्या आदल्या दिवशी काँग्रेसला खिंडार पाडून ऑपरेशन कमळ यशस्वी करण्याचा भाजपाचा डाव फसला. भाजपाने काँग्रेसचे 8 आमदार फोडण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती, मात्र फक्त 5 आमदार त्यांच्या गळाला लागल्याने ऑपरेशन कमळ फसल्यात जमा आहे.
दरम्यान यात पुढाकर घेतलेल्या मायकल लोबो यांची विरोधी पक्षनेतेपदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात आल्याचे काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मायकल लोबो यांची विरोधी पक्षनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली असुन, दिगंबर कामत यांनी पाठीत खंजीर खुपसला, अशी खंत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान दोन्ही नेत्यांवर कारवाई होणार, असा इशारा दिनेश गुंडू राव यांनी दिला. सध्या काँग्रेसकडे 6 आमदार आहेत, इतर आमदारांनी विचार करून पक्षात परतावे, असे आवाहन अमित पाटकर यांनी केले. राज्यात सध्या जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत.
“आमचे किमान 8 आमदार निघून जावेत यासाठी भाजप 2/3 विभाजनाचा प्रयत्न करत होता. आमच्या अनेक लोकांना मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली आहे. ऑफर केलेल्या रकमेने मला धक्का बसला आहे. पण आमचे 6 आमदार ठाम राहिले, मला त्यांचा अभिमान आहे”
ते पुढे म्हणाले, नवा नेता निवडला जाईल. या पक्षांतराच्या विरोधात कायद्याने जी काही कारवाई करावी लागेल, ती पक्षविरोधी काम करेल. बघू किती लोक राहतील. आमचे 5 आमदार येथे आहेत. आम्ही आणखी काही आमदारांच्या संपर्कात आहोत आणि ते आमच्यासोबत असतील. काँग्रेस पक्ष निराश होणार नाही, कमकुवत होणार नाही. हा मुद्दा आम्ही अधिक आक्रमकपणे मांडू. सत्तेसाठी आणि वैयक्तिक फायद्यासाठी 2 जणांनी केलेला हा विश्वासघात आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू असे ते म्हणाले.





























































