चैत्री वारी रद्द; भाविकांना पंढरपूर शहरात बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन आजचा चैत्रीवारीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. एकादशीचे औचित्य साधून करण्यात येणारे धार्मिक विधी समितीच्या वतीने पार पाडले जाणार आहेत. वारीची परंपरा खंडित होऊ नये यासाठी प्रतीकात्मक स्वरूपात वारीचा सोहळा साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात कडक नाकाबंदी केली असून, भाविकांनी स्नानासाठी आणि दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन मंदिर समिती आणि पोलिसांनी केले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा चैत्र वारी प्रतीकात्मक स्वरूपात साजरी होत आहे. वारी काळात पंढरीत भाविकांनी प्रवेश करू नये यासाठी पोलिसांनी शहरातील अहिल्या चौक, तीन रस्ता, चौथा मैल, वाखरी चौक रस्ता, कोरर्ती फूट रस्ता, गोपाळपूर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, अर्बन बँक चौक या 9 ठिकाणी नाकाबंदी केली आहे. सर्व वाहनांची तपासणी करूनच ती शहरात सोडली जाणार आहेत, तसेच दिवसा व रात्री एकूण 5 वाहने पेट्रोलिंगसाठी नेमण्यात आली आहेत.

ही वाहने शहराबाहेरून आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवून राहणार आहेत, तसेच वारीकाळात विनाकारण बाहेर फिरताना आढळल्यास त्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील मठ, धर्मशाळा, लॉज यांची चार्ली पथकाकडून तपासणी केली जाणार असून, वारकऱयांना मठामध्ये ठेवू नये, अशा सूचना सर्व व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत.

असा असेल बंदोबस्त

बंदोबस्तासाठी 1 डीवायएसपी, 10 सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 4 पोलीस निरीक्षक, 100 पोलीस अंमलदार, 1 आरसीपी नेमण्यात आले आहेत. शहर व तालुक्यात वाढत्या कोरोनामुळे यंदाची चैत्र वारी प्रतीकात्मक स्वरूपात होत आहे. सदर यात्रेसाठी भाविकांनी पंढरपूर शहरात प्रवेश करू नये, असे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी केली आहे. भविकांसह वारकऱ्यांनी घरात राहूनच यात्रा साजरी करावी व कोरोना रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.