
शासकीय कर्मचाऱयांना मारहाण, शिवीगाळ यामध्ये पटाईत असलेल्या मिंधे गटाचे वादग्रस्त आमदार संतोष बांगर यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. विश्रामगृहात सेवा बजावणाऱया कर्मचाऱयाला मोबाईलवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून दमबाजी केल्याचा प्रकार पंढरपुरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात शनिवारी रात्री घडला आहे. आमदारांनी दमबाजी करूनदेखील रूम देत नसल्याने रूम मागण्यासाठी आलेल्या त्यांच्या चार-पाच मद्यपी कार्यकर्त्यांनी सौरभ कदम या कर्मचाऱयाला बेदम मारहाण केली.
सौरभ कदम हे नेहमीप्रमाणे आपली सेवा बजावीत असताना एका कारमधून पाच व्यक्ती विश्रामगृहावर आले. त्यांनी रूम देण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीवर कदम यांनी ‘बुकिंग केले आहे का?’ अशी विचारणा केली. बुकिंग केल्याशिवाय रूम दिली जात नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या कार्यकर्त्यांनी कदम यांना दमबाजी सुरू केली. ‘आम्ही आमदार संतोष बांगर यांचे कार्यकर्ते आहोत,’ असे म्हणत रूम उघडून देण्यासाठी आग्रह करू लागले. दरम्यान, त्यांतील एकाने आमदार बांगर यांना पह्न लावून रूम देत नसल्याची तक्रार केली. कार्यकर्त्यांची ही तक्रार ऐकून बांगर चांगलेच संतापले. त्यांनी कदम यांना पह्नवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. दमबाजी व शिवीगाळ करूनदेखील कदम रूम उघडून देत नसल्याने बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी कदम यांना बेदम मारहाण करून पळ काढला.
ही घटना रात्री उशिरा घडल्याने कदम यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली नाही. मात्र, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांना याबाबत माहिती दिली असून पोलीस कारवाईबाबत गावडे वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.




























































