
सुनील उंबरे
तुळशी वृंदावनातील संतांची दोन मंदिरे अचानक कोसळल्याने, वनात उभारलेल्या भव्य विठ्ठल मूर्ती विषयी चिंता व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मूर्तीच्या बाजूची जमीन खचण्यास सुरुवात झाली असून श्री विठ्ठलाच्या मूर्तीला धोका होण्यापूर्वी या मूर्तीचे तत्परतेने संरक्षण करणे आवश्यक आहे. पंढरीच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या तुळशी वृदावनाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने, या वनातील संत चोखामेळा, संत एकनाथ यांचे मार्बल मध्ये बांधलेले मंदिर कोसळले आहे.
या दुर्घटनेत दोन्ही संतांच्या मूर्तीची मोडतोड झाल्याने, वारकरी संप्रदायातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून तुळशी वृंदावनाची सुंदर अशी वास्तू साकार झाली होती. या ड्रीम प्रोजेक्टसाठी सुमारे सात कोटी रुपये खर्ची पडले आहेत. काळया मातीच्या ढीगाऱ्यावर हे तुळशी वृंदावन उभारल्याने, तिथे उभारलेली संतांची मंदिरे जमिनीत खचली जात आहेत. वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यासह आठ संतांची देखणी मंदिरे याठिकाणी उभारली आहेत. मात्र मंदिर उभारताना मंदिराचा पाया मजबूत न केल्याने, सदरची मंदिरे हळूहळू जमिनीत गाडली जात आहेत.
काळया मातीत काळजीपूर्वक पाया न घेतला गेल्याने तुळशी वृदावनात जे काही बांधकाम उभा राहिले आहे त्यातील बहुतांश बांधकाम खचण्यास सुरुवात झाली आहे. या वनाचे बांधकाम सूरु असताना ‘दैनिक सामना’ने बांधकामाचा पाया खचत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. मात्र वन विभाग आणि बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांनी अपेक्षित दक्षता घेतली नाही. वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे कोट्यावधी रुपये खर्च केलेले तुळशी वन आज खिंडार बनत असून या वनातील श्री विठ्ठल मूर्तीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
सुमारे चाळीस फूट उंचीची देखणी श्री विठ्ठलाची मूर्ती वनात उभारली असून या मूर्तीच्या सभोवताची जमीन खचण्यास सुरुवात झाली आहे. या मूर्तीचे वेळीच संरक्षण न केल्यास मूर्ती केव्हाही जमीनदोस्त होण्याचा धोका आहे. दोन संतांच्या मूर्ती जमीनदोस्त झाल्या प्रकरणी मुनगंटीवार यांनी चौकशी समिती नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत. यथावकाश समिती नेमली जाईल चौकशीही होईल पण तोपर्यंत श्री विठ्ठलाची मूर्ती सुरक्षित राहील का याची शाश्वती वन विभाग देणार का हा खरा यक्ष प्रश्न आहे. मुनगंटीवार यांनी तातडीने यात लक्ष घालण्याची मागणी वारकरी संप्रदायातून होत आहे.



























































