धनगर आरक्षण न मिळाल्यास मंत्रालयात पाऊल टाकणार नाही! पंकजा मुंडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bjp-minister-pankaja-munde

विजय जोशी । नांदेड

सत्तर वर्षे सत्तेत राहणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारकडून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावता आलेला नाही;पण केंद्रात व राज्यात धनगर समाजामुळे सत्तापरिवर्तन झाले. या समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यातील भाजप सरकार अनुकुल भूमिका घेत आहे. आपणाला दिलेला शब्द पाळणार आहोत. धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषयी जोपर्यंत मार्गी लागणार नाही, तोपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नाही, यासाठी वेळ प्रसंगी सरकारवर काठी उगारायला मागेपुढे हटणार नाही, असे आश्वासन राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

भाजपचे राज्य प्रवक्ते गणेश हाके यांच्या पुढाकाराने माळेगाव यात्रेत चौथ्या वर्षी ही धनगर आरक्षण जागर मेळाव्याचे आयोजन रविवार दि. 6 जानेवारी रोजी मल्हारगडावर करण्यात आले होते. या जागर मेळाव्याचे उद्घाटन राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. या वेळी व्यासपीठावर पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर, खा. पद्मश्री विकास महात्मे, आ. प्रताप पाटील चिखलीकर, भाजपा परभणी जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे, रासपाचे महासचिव बाळासाहेब दोडपल्ले, देविदास राठोड, शिवसेनेचे नेते मुक्तेश्वर धोंडगे, अहमदपुर पंचायत समिती सभापती आयोध्या केंद्रे, स्वागताध्यक्ष चंद्रसेन पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

पंकजा मुंडे म्हणाल्या, की समाजाच्या शिडया करून मोठी पदे भूषविणार्‍यांनी सत्तर वर्षांमध्ये समाजाच्या आरक्षणासंदर्भात ठोस भूमिका घेतली नाही. बारामतीला सन 2014 मध्ये धनगर आरक्षणासंदर्भात उपोषण झाले. त्यावेळी सत्तेत असणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आरक्षण देण्याबाबत ठोस भूमिका घेता आली नाही; परंतु स्व. गोपीनाथ मुंडे यांनी आरक्षणाचा शब्द दिला, आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देण्याची अनुकुल भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. मी किंवा माझा भाऊ महादेव जानकर यांनी हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकावे, यासाठी प्रयत्न केले आहेत. सर्वसामान्यांपर्यंत विकास नेण्याचे काम करतो आहोत. वंचितांची वाणी व वाली बनण्याचे काम आम्ही करणार आहोत.

अहिल्याबाई होळकर यांची प्रेरणा घेऊन मी काम करते आहे. सत्तेमध्ये आणण्याचे पाईक तुम्ही आहात. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे वचन आमच्या सरकारने दिले, असून ते निश्चितच पूर्ण करू, आरक्षणाचा विषयी मार्गी लावूनच मंत्रालयात पाऊल ठेवण्याचा संकल्प यावेळी पंकजा मुंडे यांनी केला.

आपण दिलेली घोंगडी मायेच तर काठी शक्तीचे प्रतिक आहे. आरक्षणात कुणी पाय घातला, तर ही बहिण काठी उगारल्याशिवाय राहणार नाही. मागच्या सत्ताधारी पुढार्‍यांनी जे केले, ते फसवेगिरी आमच्या हातून होणार नसून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चे काढायची वेळ आली, तर राजकारण बाजूला ठेवून सर्वात पुढे असेल, अशी ग्वाही पंकजा मुंडे यांनी दिली.

धनगर समाजाचे नेते महादेव जानकर म्हणाले,की आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादीची नियत साफ नसून आरक्षण विषयावरून समाजाची दिशाभूल करून निवडणुकीच्या तोंडावर समाजाविषयी पुतणा-मावशीचे प्रेम राष्ट्रवादी दाखवित आहे. आमची आरक्षण देण्याची मनापासून भूमिका आहे. संवैधानिक बाबी तपासून कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण आम्हाला द्यायचे असून यामुळे वेळ जरी होत असला, तरीही आरक्षण हे विद्यमान भाजप सरकारच देऊ शकते, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धनगरसमाजाबद्दल खरच प्रेंम होते. तर सत्तर वर्षांमध्ये आरक्षण काय देऊ केले नाही, असा सवाल उपस्थित करत धनगर समाजासाठी एक ही योजना का कार्यान्वित केली नाही, अशी विचारणा विरोधकांना केली. या वेळी खा. विकास महात्मे यांनी सरकार घेत असलेल्या सामाजिक निर्णयाची माहिती त्यांनी मेळाव्यानिमित्ताने विषद केली, आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी माळेगाव यात्रेत पाखलीच्या मानकर्‍यांसाठी सभागृह व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक उभारणार असल्याचे सांगितले. तर प्रस्ताविक जि.प.सदस्य तथा मेळाव्याचे स्वागताध्यक्ष चंद्रसेन पाटील यांनी केले. या मेळाव्या हजारोच्या संख्येने धनगर समाजाची उपस्थिती होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ललकार मेळावा अपयशी ठरल्याचा धागा पकडत माळेगावात घोडे-गाढवांचा तर बाजार भरला; पण राष्ट्रवादीने मांडलेला आरक्षण बाजार फेल गेला, अशी टिप्पणी पंकजा मुंडे यांनी करताच उपस्थितांनी मोठी दाद दिली.