पनवेल-कर्जत नवी उपनगरी मार्गिका पूर्णत्वाच्या मार्गावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील दळणवळणात मोठी क्रांती घडवून आणू पाहणाऱ्या पनवेल-कर्जत नवीन उपनगरी रेल्वे मार्गिकेचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. जुलै महिन्यात या प्रकल्पाच्या कामात लक्षणीय प्रगती झाली. त्यामुळे नजीकच्या काळात या मार्गावर पहिली लोकल धावण्याची आशा पल्लवित झाली आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) नव्या मार्गिकेचे काम वेगाने केले जात आहे.

 

सद्यस्थितीत पनवेल-कर्जतच्या प्रवासाला दीड तासाचा अवधी लागत आहे. नव्या उपनगरी मार्गिकेमुळे हा प्रवास अवघ्या ४० मिनिटांत जुलै महिन्यात प्रकल्पाची लक्षणीय प्रगती शक्य होणार आहे. त्याचदृष्टीने एमआरव्हीसीने प्रकल्पाला गती दिली. प्रकल्पांतर्गत चिखले आणि मोहापे येथील भूमिगत मार्ग (सबवे) पूर्ण करण्यात आला, तर रोड ओव्हर ब्रिज ८९/१ आणि ९०/२ हे स्थानिक ग्रामस्थांच्या वापरासाठी खुले करण्यात आले. तसेच बोगदा-१ आणि बोगदा ३मधील केबलिंगची कामेही पूर्ण झाल्याची माहिती एमआरव्हीसीतर्फे देण्यात आली आहे.

 

विद्युतीकरणाच्या कामातही लक्षणीय प्रगती झाली आहे. २९.६ किलोमीटर लांबीच्या या नवीन रेल्वे मार्गिकेवर पनवेल, चिखले, पोयंजे (मोहापे), चौक आणि कर्जत ही पाच प्रमुख स्थानके उभारण्यात आली आहेत. हा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. २०२६च्या अखेरीस हा प्रकल्प ‘कमिशनर ऑ फ रेल्वे सेफ्टी’ यांच्याकडून सुरक्षा तपासणीसाठी सज्ज होणार आहे.