
परळीतील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे तसेच धनंजय मुंडे यांना एकाच व्यासपीठावर पाहून उपस्थितांची मती गुंग झाली. पंकजा आणि धनंजय यांनी असेच एकत्र राहावे, असा सल्ला देतानाच आम्ही तीनही पक्षांची ताकद त्यांच्या पाठीशी उभी करू, असे हमीपत्रही फडणवीसांनी दिले. दरम्यान, कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या या कार्यक्रमाकडे मराठा समाजाने पाठ फिरवली.
गेल्या वर्षभरापासून रखडलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम अखेर मंगळवारी परळीत घेण्यात आला. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजनमधून भक्कम निधी मिळवला. तब्बल पाच कोटी रुपये या कार्यक्रमावर खर्च करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी शासकीय योजनांचा पाढा वाचून दाखवला.
नवलची घडले
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी सुरू केलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचे तोंड भरून कौतुक केले. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना एकत्र बघून सर्वांना आश्चर्य वाटत आहे. पण या दोघांनी असेच एकत्र राहावे आम्ही तीनही पक्ष त्यांच्या पाठीशी सगळी ताकद उभी करू, असे फडणवीस म्हणाले. यापूर्वी पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यात झालेल्या अनेक कार्यक्रमात फडणवीसांबरोबर व्यासपीठावर जाणे टाळले होते. त्यामुळे फडणवीसांच्या या वक्तव्याने जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
कुणाच्या तोंडात घातलेला आरक्षणाचा घास हिरावणार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला आहे. राज्य सरकारचीही हीच भूमिका आहे. घटनेने ज्यांना आरक्षण दिले आहे, त्यांच्या तोंडातील आरक्षणाचा घास हिरावून दुसर्यांना देण्यात येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
मराठा समाजाचा विरोध
कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या या कार्यक्रमाकडे मराठा समाजाने पाठ फिरवली. परळी तालुक्यातील मराठा बहुसंख्य असलेल्या गावात पाठवण्यात आलेल्या बसेस रिकाम्याच परत पाठवण्यात आल्या. तालुक्यातील बोरखेड, तेलसमुख आचार्य टाकळी, ममदापूर, दिग्रस, कौडगाव हुडा, कौडगाव साबळा, कानडी, नागापूर, धानोरा (बु), पोहनेर, पिंपळगाव, हिवरा गोवर्धन या गावांमध्ये मराठा समाजाकडून आरक्षण मिळेपर्यंत राजकीय कार्यक्रमांना विरोध असल्याचे सांगण्यात आले.



























































