
परमबीर सिंह यांना निलंबित करण्याचा दुसरा प्रस्ताव राज्याच्या पोलीस महासंचालकांनी राज्याच्या गृह विभागाला पाठवला आहे. त्यावर राज्य सरकारने कारवाई सुरू केली आहे. खंडणी वसुलीप्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह अन्य काही पोलिसांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मागील महिन्यात पाठवला होता. त्यावर कारवाई करण्यापूर्वी प्रत्येक पोलीस अधिकाऱयांच्या विरोधातील स्वतंत्र माहिती पाठवण्याची सूचना गृह विभागाने केली होती. त्यानुसार पोलीस महासंचालकांनी अलीकडेच नव्याने प्रस्ताव पाठवला होता. निलंबनाचा हा नवा प्रस्ताव गृह विभागाला सादर झाला आहे. त्यावर आता गृह विभागाने कारवाई सुरू केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने दिली.




























































