पार्ले टिळक विद्यालयाचा शताब्दी सांगता सोहळा संपन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या  पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आणि पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेने गत वर्षी 100 वर्षे पूर्ण केली. शताब्दी सांगता निमित्त संस्थेच्या 101 व्या वर्धापनदिनी म्हणजे 9 जून 2022 रोजी भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते. सकाळी झालेल्या सत्रात मराठी शाळेचे माजी विद्यार्थी भारतीय हवाई दल प्रमुख प्रदीप नाईक (निवृत्त), उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

”पार्ले टिळक सारख्या संस्था शैक्षणिक क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करत असतात” असे गौरवोद्गार , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या कार्यक्रमात काढले. माजी भारतीय हवाईदल प्रमुख प्रदीप नाईक यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने आणि भाषणाने उपस्थित विद्यार्थी भारावून गेले. मराठी शाळेला 100 वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण केले आहे तसेच 100 वर्षांचा इतिहास डिजिटल स्वरुपात शाळेच्या लॉबीमध्ये उपलब्ध करण्यात आलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांना संरक्षण दलात जाण्याची प्रेरणा मिळावी या हेतूने शाळेत एक विशेष शौर्य कक्ष तयार करण्यात आलेला आहे. या सर्वांचे उद्घाटन  प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. तर संध्याकाळच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पदमविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर हे उपस्थित होते. या वेळी मंचावर पाटिविअचे अध्यक्ष अनिल गानू, कार्यवाह दिलीप पेठे , संचालिका आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॅा स्नेहलता देशमुख उपस्थित होत्या. याप्रसंगी पाटिविअ शताब्दी गौरव ग्रंथाचे प्रकाशन माननीय राज्यपालांच्या हस्ते झाले. संस्थेच्या पार्ले येथील मराठी शाळेच्या भव्य प्रांगणात  हा अतिशय नेटका कार्यक्रम झाला. यासाठी भव्य मंडप आणि देखणा मंच उभारण्यात आला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाटिविअ सारख्या केवळ शिक्षण नाहीतर संस्कार देणाऱ्या संस्थाच उत्तम नागरिक घडवू शकतात असे सांगितले. तर पद्मविभूषण माशेलकरांनी पाटिविअ चे कौतुक करत संस्थेला परत भेट देण्याचे आश्वासन दिले.

या विशेष दिवसाचा शेवट संस्थेच्या विविध शाळातील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येवून तयार केलेल्या समूह वादन, गायन, नृत्य आणि नाटक या अतिशय बहारदार कला गुण दर्शनाच्या  कार्यक्रमाने झाला. पार्लेकरांसाठी हा सोहळा अत्यंत  जिव्हाळ्याचा असल्याने या कार्यक्रमाला सर्वच क्षेत्रातील मान्यवर  नागरिकांची मोठ्या प्रमाणात  उपस्थिती लाभली.