डिजिटल मंचाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, सीएसआर आणि नागरिकांच्या सहभागातून ‘पार्टिसिपेट मुंबई’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या विकास प्रक्रियेत नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि तज्ञांचा सहभाग वाढविण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘पार्टिसिपेट मुंबई’ हा नवा डिजिटल मंच सुरू केला आहे. निधी, वस्तुरूप मदत, तज्ञांचे ज्ञान किंवा स्वयंसेवा अशा विविध स्वरूपात नागरिक मदत करून या उपक्रमाशी जोडले जाऊ शकतात.

‘पार्टिसिपेट मुंबई’चे लोकार्पण मंगळवारी पालिका सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. ‘पार्टिसिपेट मुंबई’ हा केवळ सीएसआर निधी उभारण्याचा मंच नसून शासन, महापालिका, कॉर्पोरेट आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन विकासासाठी काम करण्याचे व्यासपीठ आहे. ‘समग्र’ संस्थेबरोबरच्या सामंजस्य करारामुळे महापालिकेच्या सेवा वितरण व्यवस्थेत सुधारणा, प्रशासकीय प्रक्रिया सुलभ होण्यास व कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबईतील कुपोषणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज

शिक्षण, आरोग्य आणि पोषण या क्षेत्रांतही अधिक परिणामकारक हस्तक्षेप करण्याची गरज आहे. शहरातील काही भागांत कुपोषण, बालकांमधील खुंटलेली वाढ यासारख्या समस्या अद्याप दिसून येतात. विशेषतः झोपडपट्टय़ा आणि गरीब वस्त्यांमधील मुलांपर्यंत पोषण पोहोचविण्यासाठी सीएसआर भागीदारीचा प्रभावी वापर करण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.