
आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन येणाऱ्या तालुक्यातील धनगरवाडी येथील वारकऱ्यांच्या गाडीला रविवारी रात्री उशिरा अपघात झाला. या अपघातात रावण सखाराम गाढे (55) या वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर या घटनेत आठ वारकरी जखमी झाले आहेत.
ही घटना रविवारी रात्री बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हाकेवाडी या ठिकाणी घडली आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, धनगरवाडी येथील वारकरी पिकअप गाडीने पंढरपूरला गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना हाकेवाडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या खडीच्या ढिगाऱ्यावर त्यांची गाडी जाऊन ती पलटी झाली.
या अपघातात गाढे यांचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात बंडू बाजीराव गाढे, हरी बबन चितळे, अशोक रावसाहेब चितळे, शोभा महादेव चितळे, गोरक्ष दादाबा गाढे, कोंडाबाई पंढरीनाथ गाडे, तुळशीराम नामदेव गाढे, सुधाकर भाऊ गाढे (सर्व रा. धनगरवाडी ता. पाथर्डी) हे जखमी झाले असून जखमींपैकी तीन जणांना नगर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.





























































