तडीपार गुंडाकडून तरुणाला बेदम मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पाथर्डी

बाजार समितीच्या आवारात लघुशंके साठी गेलेल्या तरुणाला तडीपार गुंडासह पाच जणांनी बेदम मारहाण करत त्याच्याजवळील साडेसहा हजार रुपये लुटले. ही घटना रविवारी रात्री घडली. या घटनेत तडीपार असलेला तरुण संदीप लबडे व त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक करून दरोड्याचा गुन्हा नोंदवला आहे. या बाबत अधिक माहिती अशी कि या घटनेतील फिर्यादी अजय साठे यांचे शेवगाव रोडच्या लगत दुकान असून रविवारी रात्री ते आपल्या दुकानाच्या मागे असलेल्या बाजार समितीच्या मोकळ्या आवारात लघुशंके साठी गेले होते.

त्याचवेळी संदीप लबडे,पवन मोरे,आकाश चन्ने,आकाश चातुर,शुभम काळे हे गुंड तेथे आले व त्यांनी अजय साठे यांना हॉकी स्टिक व लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील साडे सहा हजार रुपये काढून घेतले. साठे यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संदीप लबडे व आकाश चन्ने यांना अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत. संदीप लबडे हा तडीपार असून गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी त्याला जेरबंद केले होते. त्या नंतर तो पुन्हा शहरात आला व त्याने साठे यांना मारहाण केली.