रिक्त पदांमुळे रुग्णांची हेळसांड; शिवसेनेचा देवगड रुग्णालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा

देवगड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांची होणारी हेळसांड शासनाच्या व प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी गुरुवारी (ता. 12 ऑक्टोबर 2023) देवगड ग्रामीण रुग्णालयासमोर धरणे आंदोलन निदर्शने करण्यात येणार असल्याचा इशारा देवगड शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय विटकर यांच्याकडे देण्यात आले आहे.

ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, नर्स यांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. याबाबत अनेकदा निवेदन देऊनही रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली होती. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आश्वासने देऊनही अद्याप ती पूर्ण झालेली नाहीत. रुग्णालयातील रिक्तपदे 12ऑक्टोबरपर्यंत न भरल्यास देवगड ग्रामीण रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन शांततेत लोकशाही मार्गाने केले जाणार आहे. यावेळी काही समाजकंटकांकडून या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करण्याची शक्यता वाढली आहे. असे कोणतेही अनुचित प्रकार घडल्यास अशा प्रसंगांची सर्वस्वी जबाबदारी आपली आपल्या प्रशासनाची राहील अशा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख, नगरसेवक सुशांत नाईक, सतीश सावंत, कन्हैया पारकर तालुका प्रमुख मिलिंद साटम ,जयेश नर महिला संघटक हर्षा ठाकूर युवसेना तालुका प्रमुख गणेश गावकर,फरीद काझी,नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी, नितीन बांदेकर,विशाल मांजरेकर सुधीर तांबे,विकास कोयडे, गणेश वाळके,संतोष दळवी अन्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या निमित्ताने देवगड पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन दाभोळे येथील नापत्ता युवतीबाबत तिच्या नातेवाईकांसमवेत त्या घटनेबाबत व अन्य बाबीची विचारणा केली. तसेच देवगड ग्रामीण रुग्णालय येथे शिवसेना व भाजप कार्यकर्ते हे आमने सामने आले असता पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेत शिवसेना पदाधिकारी यांच्यावर अन्याय केला.या बाबत सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडीत देवगड पोलीस प्रशासन कारभार समोर आणणार आहोत. येत्या अधिवेशनात ही घटना उपस्थित करण्यात येणार असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले.