
सामना प्रतिनिधी । पुणे
पवार आणि पुण्याचा अनेक वर्षांपासूनचा घनिष्ट संबंध आहे, नरहर पवार नावाच्या ज्येष्ठ इंजिनीअरने स. प. महाविद्यालय, फिल्म इन्स्टिटय़ूट, महादजी शिंदे पॅलेस, प्रभात टॉकीज अशा अनेक महत्त्वाच्या वास्तू बांधल्या, आणखी काय करायचे बाकी आहे, तरीही पुणेकरांनी पवारांबद्दल मेहेरबानी दाखविली नाही अशी खंत मिश्कीलपणे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
पेपरलिफ संस्थेतर्फे पुण्यातील दुर्मिळ छायाचित्रांचे संग्रह असलेल्या दिनदर्शिकेचे आणि ‘पुणे एकेकाळी’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्यानंतर ते बोलत होते. प्रकाशनानंतर शरद पवार आणि श्रीानिवास पाटील यांच्याशी सुधीर गाडगीळ यांनी गप्पा मारल्या.
प्रभा जोग यांची भाषणे, गुडलकचा खिमा, बीएमसीसीत असूनही स. प. महाविद्यालयात जास्त असलेला वावर, महाविद्यालयीन निवडणुका, रात्री अडीच वाजता मंडईत घेतलेला चहा, कारण नसताना एका मुलीने रस्त्यावर केलेली भांडणे, वैशाली आणि रुपाली हॅटेलच्या जगन्नाथ शेट्टी यांना मालकाच्या मुलीशी लग्न करण्याचा दिलेला सल्ला अशा अनेक आठवणींना शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांनी यावेळी उजाळा दिला.
श्रीनिवास पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या संगतीत आणि पुण्याच्या संस्कृतीत मी वाढलो. येथूनच मी राजकीय धडे घेतले. माझ्या कारकिर्दीमध्ये पुण्याचा आणि शरद पवारांचा मोठा सहभाग आहे.
अन् नृत्यात सुवर्णपदक मिळविले
कॉलेजमध्ये असताना एका मुलीने कारण नसताना माझ्याशी आणि श्रीनिवास पाटील यांच्याशी भर रस्त्यात भांडणे केली. ती शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेत होती, नाचायला सुध्दा अक्कल लागते असे तिने आम्हाला सुनावले. याचा राग येऊन श्रीनिवास पाटील यांनी नृत्याचे प्रशिक्षण घेतले आणि विद्यापीठात सुवर्णपदक मिळविल्याची आठवण शरद पवार यांनी सांगितली.
अपमानातून विधानसभेत आलो
एकदा मुंबई पाहायला गेलो असताना विधानसभेत गेलो. प्रेक्षक गॅलरीत बसून तेथे अत्रेंचे भाषण ऐकताना माझ्याकडून नीट बसण्याच्या संदर्भातील नियम मोडले गेले. त्यावेळी मला तिथल्या सुरक्षारक्षकाने कॉलरला धरुन बाहेर काढले. त्यावेळी मी त्याला म्हटले की यापुढे आलो तर थेट आमदार म्हणूनच येतो, आणि या अपमानातून मी विधानसभेत पोहोचल्याची आठवण पवार यांनी सांगितली.
आता निवडणूक नाही
ज्या पुणेकरांनी भरभरून प्रेम केले त्यांचे प्रतिनिधित्व निवडणुकीत करणार का, असा सवाल केल्यानंतर आता निवडणूक नाही असे म्हणून पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासंदर्भातील चर्चांना त्यांनी विराम दिला.




























































