चेक बाउन्स झाल्यास वीजग्राहकांना दीड हजाराचा दंड; महावितरणचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

वीजबिल भरणा करताना ग्राहकांकडून दिले जाणारे चेक बाउन्स झाल्यास आता दीड हजाराचा दंड आकारला जाणार आहे. महावितरणने हा निर्णय घेतला आहे.

वीजबिलाचा भरणा करताना काही ग्राहकांकडून महावितरणला तेवढ्या रकमेचा चेक दिला जातो. मात्र यातील अनेक चेक बाऊन्स होतात. बाऊन्स झालेल्या चेकमुळे त्या ग्राहकांना महावितरणकडून ३५० रुपयांचा दंड आकारला जात होता. आता या दंडाच्या रकमेत वाढ करुन तो दीड हजार करण्यात आला आहे. महावितरणने वीजदराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारीत आदेशामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने यासंदर्भात आदेश दिला असून, १ नोव्हेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

परिमंडलातील सुमारे नऊ हजार लघुदाब वीजग्राहक हे धनादेशाद्वारे दरमहा वीजबिलांचा भरणा करतात. परंतु यातील सुमारे साडेतीनशे धनादेश दरमहा विविध कारणांमुळे बाऊन्स होत आहेत. त्यासाठी संबंधित वीजग्राहकांना यापूर्वी ३५० रुपये दंड लावण्यात येत होता. मात्र आता १ नोव्हेंबरपासून धनादेशाचा अनादर झाल्यास १५०० रुपये किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल तो दंड म्हणून लावण्यात येत आहे. वीजबिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दिलेला धनादेश वटणे आवश्यक आहे. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद होते. परंतु अनेक वीजग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास साधारणतः तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे मुदतीनंतर वीजबिलाचा भरणा झाल्यास संबंधित ग्राहकांना धनादेशाद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात दिली जाते. किंवा कोणत्याही कारणाने धनादेश बाऊन्स झाला तर आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. धनादेशाऐवजी वीजग्राहकांनी ऑनलाईन बिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.