
सामना प्रतिनिधी । नाशिक
अंबडच्या केवल पार्क येथील दांपत्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी चार सावकारांना अटक केली आहे, त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यात आणखी संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
केवल पार्क येथील वासुदेव जाधव आणि त्यांची पत्नी संगीता यांनी शुक्रवारी दुपारी घरात वीष प्राशन करून जीवन संपविले. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरून अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बारा लाख रुपये व्याजाने देणारा खुटवडनगर येथील अशोक केदू होळकर, अडीच लाख रुपये देणारा अंबडचा सुनील पूरकर, वीस हजार रुपये देणारा अमोल सोनवणे, दहा हजार रुपये देणारा राहुल जाधव या चौघा सावकारांना पोलिसांनी अटक केली. त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
प्रवीण भाऊ नावाचा एकजण फरार आहे. हे सर्वजण जाधव दाम्पत्याकडून दरमहा तीन ते सहा टक्के दरशेकडा दराने व्याज घेत होते. त्यांना व्याजाची रक्कमही दिली जात होती. मात्र, मुद्दल रक्कम व्याजाच्या ओझ्याने परत करणे शक्य होत नव्हते, यामुळे हे सावकार व त्यांची वसुली करणारे गुंड त्यांना धमकावत होते. या जाचाला कंटाळून जाधव पती-पत्नीने जीवन संपविले. त्यांना धमकावणाऱया गुंडांचाही पोलीस शोध घेत आहेत. या सावकारांचा आणखी कुटुंबांना जाच होता का, याची खात्री पोलीस करीत आहेत. तक्रारी वाढल्यास या टोळीविरुद्ध आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.




























































