
राज्यात आणि देशात भाजपविरोधात जनतेचा कौल दिसत आहे. सर्वत्र फिरताना जनतेची हीच भावना दिसून येते. त्यामुळे आता जनतेलाच राज्यात आणि देशात सत्ताबदल हवा असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात आता सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. विरोधकांनी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी आपणही प्रयत्नशील आहोत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. शरद पवार यांनी सोमवारी सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थितीसह जनतेचा कौल काय आहे, त्याबाबतही मत व्यक्त केले.
राष्ट्रवादी पक्षाध्यक्षपदावरून आपण घेतलेली निवृत्ती पक्षातील कार्यकर्त्यांसाठी मागे घेतली. पुढील वर्षापर्यंत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत आपण अध्यक्षपदी राहणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीने ऐक्याची मूठ बांधली आहे. परंतु प्रसारमाध्यमांनी महाविकास आघाडीत फूट पडण्याच्या खोट्या बातम्या सोडणे बंद करावे, अशा शब्दांत त्यांनी प्रसारमाध्यमांना कानपिचक्या दिल्या. शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर व्हावा म्हणून काहीजणांनी देव पाण्यात ठेवले होते, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. त्याकडे लक्ष वेधले असता पवार यांनी, देव पाण्यात ठेवण्याचे काम भाजपशिवाय अन्य कोण करणार, असा टोला लगावला.
कर्नाटकातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी महाविकास आघाडी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचारात उतरले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी महाराष्ट्रातील नेत्यांनी उभे राहणे गरजेचे आहे, असेही शरद पवार म्हणाले.































































