हजार जणांच्या सभेला परवानगी, निवडणूक आयोगाचे नवे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता आगामी पाच राज्यांमध्ये होणा-या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने रॅली आणि रोड शोवर 31 जानेवारीपर्यंत बंदी घातली होती. सोमवारी निवडणूक आयोगाच्या पार पडलेल्या बैठकीत रॅली आणि रोड शोवरील निर्बंध आता 11 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आले आहेत. मात्र, उमेदवारांना काहीसा दिलासा दिला असून हजार जणांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे.

गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी केंद्रीय आरोग्य सचिवांची भेट घेतली. त्यानंतर नवे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार एक हजार लोक प्रचारसभेत सामील होऊ शकणार आहेत. इनडोअरसाठी सभांसाठी आता 500 जणांना तर डोअर-टू-डोअर कॅम्पेनसाठी 20 जणांना परवानगी देण्यात आली आहे.

8 जानेवारीला निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यावर निवडणूक आयोगाने रॅली आणि रोड शो वर सुरुवातीला 15 जानेवारीपर्यंत बंदी घातली होती. त्यानंतर 22 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली. पुन्हा त्यात वाढ करून 31 जानेवारीपर्यंत निर्बंध लागू केले होते.