
हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं तर पाळीव प्राण्यांना ठेवायचे कुठे, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र चेन्नईत पेट थीम रेस्टॉरंट सुरू झालंय. ट्विस्टी टेल असे या अनोख्या रेस्टॉरंटचे नाव आहे. तिथे ग्राहकांना पाळीव प्राण्याला नुसतं नेताच येणार नाही, तर त्यांच्यासोबत खेळताही येणार आहे.
चेन्नईच्या नुंगमबक्कम भागात ट्विस्टी टेल रेस्टॉरंट सुरू झाले आहे. प्राणीप्रेमींसाठी ही निश्चित आनंदाची गोष्ट आहे. रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना खाण्यापिण्याची सुविधा आहेच. मात्र त्यासोबतच पाळीव प्राण्यांना खेळण्यासाठी प्ले झोन तयार करण्यात आला आहे.
‘ट्विस्टी टेल’चे मालक विक्रम वैष्णव म्हणाले, मला रेस्टॉरंट सुरू करायचे होते. माझ्या पार्टनरला श्वानांची आवड आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आणि वेगळ्या संकल्पनेवरचे रेस्टॉरंट सुरू केले. इथे पाळीव प्राण्यांसोबत ग्राहकांना खेळता यावे यासाठी वेगळी जागा बनवली आहे. तिथे कमीत कमी 16 छोटय़ा पाळीव प्राण्यांसोबत मौजमस्ती करण्याचा आनंद लुटता येईल.
पेट थीम रेस्टॉरंट म्हणजे स्ट्रेस बस्टर असल्याचे मालक विक्रम वैष्णव यांनी सांगितले. संचालक रेखा यांचे हे ड्रीम प्रोजेक्ट होते. लोक पाळीव प्राण्यांवर जिवापाड प्रेम करतात. आपल्या पेटसोबत आनंदाने वेळ घालवता येईल आणि रोजच्या ताणतणावातून काही काळ सुटका होईल यासाठी खास रेस्टॉरंट उभारावे, असे रेखा यांना वाटत होते. त्यातूनच ‘ट्विस्टी टेल’ उभे राहिले, असे वैष्णव यांनी सांगितले.
























































