पिसे येथील उदंचन केंद्रात संयंत्राला आग, मुंबई शहर आणि पूर्व उपनगरामधील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बाधित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जल उदंचन केंद्रात संयंत्राला आग लागण्याची घटना सोमवारी 26 फेब्रुवारी 2024 रोजी उद्भवली. या घटनेमुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग तसेच शहर विभागातील गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. त्यामुळे, या भागांमध्ये पुढील 24 तास पाणीपुरवठा होणार नाही. तसेच याचा परिणाम पश्चिम उपनगर आणि शहर विभागातील इतर भागातील पाणी पुरवठ्याच्या दाबावर काही प्रमाणात पडेल. सबब, संबंधित भागांमधील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पिसे येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जल उदंचन केंद्र आहे. आज सायंकाळी येथील क्रमांक दोन ट्रान्सफार्मरला आग लागल्याने संपूर्ण प्रकल्पातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. परिणामी सर्व पंप बंद झाले आहेत. घटनास्थळी आग आटोक्यात आल्यानंतर संयंत्र दुरुस्ती करुन उदंचन केंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. त्यामुळे, संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे व महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे.