फेरीवाल्यांना शुक्रवारपासून प्लॅस्टिक पिशवी ‘महागात’ पडणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

येत्या शुक्रवारपासून फेरीवाल्यांना प्लॅस्टिकची पिशवी चांगलीच ‘महागात’ पडणार आहे. कारण पालिकेने प्लॅस्टिकविरोधात जोरदार कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून 1 फेब्रुवारीपासून याची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये पालिकेच्या विशेष टीमकडून प्रत्येक फेरीवाल्याची झाडाझडती घेतली जाणार असून प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास तत्काळ परवाना रद्द केला जाणार आहे.

राज्य सरकारने 23 जूनपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू केल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात प्लॅस्टिकविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. असे असताना अनेक फेरीवाल्यांकडून प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने फेरीवाल्याकडे प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास त्याला ‘ब्लॅक लिस्ट’ करून ‘फेरीवाला परवाना प्रक्रियेतून’ बाद करण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. या निर्णयाची 1 फेब्रुवारीपासून कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्लॅस्टिकविरोधात कारवाई सुरू असतानाही अनेक फेरीवाल्यांकडून ग्राहकांना प्लॅस्टिक पिशव्या दिल्या जात आहेत. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीच्या कठोर अंमलबजावणी करण्यासाठी 1 फ्रेब्रुवारीपासून फेरीवाल्यांची तपासणी करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपआयुक्त विजय बालमवार यांनी दिली.

अशी होणार कारवाई
पालिकेच्या सर्व 24 वॉर्डांमध्ये ही कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी 107 इन्स्पेक्टर, 400 सीनियर इन्स्पेक्टर आणि 260 कामगारांच्या टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीमच्या माध्यमातून मुंबईत रस्त्यांवर बसलेल्या आणि फिरून व्यवसाय करणाऱया फेरीवाल्यांची झाडाझडती घेतली जाणार आहे.

35 हजार किलो प्लॅस्टिक जप्त
23 जूनपासून पालिकेने केलेल्या कारवाईत आतापर्यंत तब्बल 35 हजार किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. निळा कोट आणि काळी टोपी घातलेल्या या निरीक्षकांकडून ही कारकाई करण्यात येत आहे. या कारकाईत प्रत्येक दिकशी 60 हजार ते एक लाखापर्यंत सरासरी दंड कसूल करण्यात येत आहे. विभागवार जप्त करण्यात आलेले हे प्लॅस्टिक पालिकेच्या गोदामांमध्ये ठेवण्यात आले आहे.