प्लॅस्टिक – बंदी व पर्याय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप प्रभाकर गडकरी

आरोग्य संवर्धन व पर्यावरण संरक्षण करायचे असेल तर प्लॅस्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रत्येक नागरिकाने सरकारला सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यांनी कापडी पिशव्या वापराव्यात. प्लॅस्टिकला पर्याय असणाऱ्या वस्तूंचा वापर करावा. सर्व सामाजिक संस्थांनी येत्या सहा महिन्यांत सार्वजनिक मैदाने, समुद्रकिनारे, नदीकिनारे, मोकळ्या जागा, रेल्वे, एसटी आदी ठिकाणी अनेक वर्षांपासून पडलेले प्लॅस्टिक गोळा करून आनंदवनसारख्या संस्थांना द्यावे. त्या संस्था त्याचा सदुपयोग करतील. असे झाले तर हिंदुस्थानातील कानाकोपरा प्लॅस्टिकमुक्त होईल व ते सर्वांच्या हिताचे ठरेल.

सध्या जे प्लॅस्टिक चर्चेचा विषय बनले आहे, त्याचा शोध 1885 साली अलेक्झांडर पार्क याने लावला व त्याला सुरुवातीला पार्कसाईन असे संबोधले गेले. त्यानंतर त्याला सेल्युलिड असे म्हटले गेले. 1965 ते 1985 यादरम्यान इंजिनींअरिंग प्लॅस्टिकचा उदय झाला. प्लॅस्टिकच्या निर्मितीसाठी विकास आणि तंत्रज्ञानात मोठा बदल झाला. चांगला टिकाऊपणा व जुळवून घेण्याची क्षमता यामुळे प्लॅस्टिकची मागणी वाढली. प्लॅस्टिक हा एक पदार्थ पेट्रोरसायन व्यवसायातील टाकाऊ गोष्टीतून निर्माण करण्यात आला. प्लॅस्टिकमुळे लाकूड, धातू व काच याचा वापर कमी होऊ लागला. त्यामुळे बरीच वृक्षतोड थांबली. खनिज संपत्तीची बचत झाली. इतर वैज्ञानिक व्यापारी आणि औद्योगिक उपयोग लक्षात घेता प्लॅस्टिक मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला.

अनेक वर्षांपासून प्लॅस्टिकने सर्वांचेच जीवन व्यापून टाकल्यामुळे सध्याचे युग हे ‘प्लॅस्टिक युग’ आहे, असे वाटू लागले. प्लॅस्टिकचा शोध जरी 1855 साली लागला असला तरी हिंदुस्थानात त्याचा वापर शंभर वर्षांनंतर म्हणजे अंदाजे 1955 नंतर होऊ लागला. प्लॅस्टिक जसे मानवाला वरदान ठरले तसेच त्याच्या अतिवापरामुळे ते शाप ठरले आहे. ‘अति तेथे माती’ असे म्हटले जाते ते खरे आहे. वापरून टाकलेले प्लॅस्टिक हजारो वर्षे मातीत गाडले गेले तरी ते नष्ट होऊन मातीशी एकरूप होत नाही. ते नष्ट तर होत नाहीच उलट जमीन नापीक करते. प्लॅस्टिक जाळून नष्ट करायचे म्हटले तर त्यामुळे हायड्रोकार्बन इत्यादी विषारी वायू तयार होतात. ते मानवासाठी धोकादायक असतात.

परदेशात कोणत्याही वस्तूची निर्मिती करतानाच त्याची विल्हेवाट कशी लावायची, याबाबत विचार केला जातो. जगात 1855 पासून प्लॅस्टिकचा वापर सुरू असला तरी प्लॅस्टिकचा सुयोग्य वापर, पुनर्वापर व कचऱ्याची विल्हेवाट यासंदर्भात योजना आखल्या आहेत. तेथील कायदे जसे कडक आहेत तसे नागरिक सुज्ञ तर आहेतच, परंतु पर्यावरण रक्षणास प्राधान्य देणारे असल्याने प्लॅस्टिकमुळे फार मोठ्या समस्या निर्माण होत नाहीत. याउलट हिंदुस्थानात 1955 पासून प्लॅस्टिकचा वापर सुरू झाला असला तरी इतर देशांपेक्षा हिंदुस्थानात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

प्लॅस्टिकच्या पातळ पिशव्या ही हिंदुस्थानसाठी डोकेदुखी ठरली आहे. एका पाहणीनुसार नुसत्या मुंबईत एका दिवसात शंभर दशलक्ष पिशव्या वापरल्या जातात. वापरून झाल्यानंतर या पिशव्या कचऱ्यात टाकल्या जातात. देशात दररोज 15 हजार 342 टन इतका प्लॅस्टिक कचरा निर्माण होतो, त्यापैकी चाळीस टक्के प्लॅस्टिक कुठेही संकलित न होता निसर्गात पडून राहते. इतके प्लॅस्टिक इतरत्र पसरले तर किती भयानक स्वरूप प्राप्त होईल याची जाणीव झाल्यामुळे देशात 2000 साली घनकचऱ्याचे व्यवस्थापन व हाताळणी कायदा आणि 2011 साली प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी कायदा अस्तित्वात आला आहे. त्यानुसार पातळ पिशव्यांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीसुद्धा अशा पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. कचऱ्यात टाकलेल्या या पिशव्या गटारातून समुद्रात जातात. गटारे तुंबतात. 25 जुलै 2005 रोजी मुंबई परिसरात जो महाप्रलय झाला त्याचे प्रमुख कारण पातळ प्लॅस्टिक पिशव्याच होत्या.

अगदी प्लॅस्टिकची निर्मिती पूर्णपणे बंद केली व यापुढे प्लॅस्टिक वापरायचे नाही असे जरी कोणी ठरवले तरी यापूर्वी उत्पादन झालेले व वापरात असलेल्या तसेच वर्षानुवर्ष समुद्रकिनारे, नदीकिनारे, मैदाने, झाडे-झुडपे यामध्ये असलेले प्लॅस्टिक कसे नष्ट करायचे याबाबत ठोस उपाय योजणे गरजेचे आहे.

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉ. विकास आमटे यांनी आनंदवनात प्लॅस्टिकनगरीची स्थापना केली आहे. येथे प्लॅस्टिकचे तुकडे, सलाईन, सिरिंज, आईक्रीमचे कप, एक्स-रे फिल्म, गुटख्याची रंगीबेरंगी वेष्टन, गाड्यांचे टायर, ट्यूब असा शहरातील घनकचरा म्हणून ज्यांची ओळख होते असा कचरा प्लॅस्टिक नगरीत जमा केला जातो. तो धुऊन निर्जंतुक केला जातो. यापैकी सलाईन, सिरिंज आईक्रीमचे कप, थर्माकोल यापासून तेथे काँक्रीट मड ब्लॉक तयार केले जातात व त्यापासून घरे बांधली जातात. इतर वस्तूंपासून व्हिजिटिंग कार्ड, पडदे, लेटरबॉक्स तयार करतात. गाद्या, लोड बनवले जातात. ज्या कचऱ्याकडे घनकचरा म्हणून बघितले जाते अशा कचऱ्यापासून टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर केला जातो. त्यामुळे पर्यावरण रक्षण होते, स्वच्छता राखली जाते, अनेकांना रोजगार उपलब्ध होतो.

या उपक्रमातून एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य होतात. घनकचऱ्याची अल्प खर्चात विल्हेवाट लावली जाते. टाकाऊतून टिकाऊ वस्तू निर्माण होतात. वस्तूंचा पुनर्वापर करण्याची नागरिकांना सवय लागते. वापरा आणि फेकून द्या ही प्रवृत्ती कमी होते. अनेकांना रोजगार मिळतो. कचऱ्यातून गोळा केलेल्या वस्तूंपासून तयार केलेल्या वस्तू वापरण्यास काही जणांना घृणा वाटत असेल, परंतु त्या वस्तू स्वतः डॉ. विकास आमटे व त्यांचे सर्व सहकारी वापरतात.

अतिशय कमी भांडवलात होणाऱ्या वस्तूंचा वापर सुरुवातीला हॉस्पिटल, रेल्वे स्थानके, बस स्थानके, धर्मशाळा, आश्रमशाळा येथे करून त्याची उपयुक्तता पटल्यानंतर प्रत्येक घरात त्याचा वापर झाला तर प्लॅस्टिकच्या भस्मासुराला आवर घालणे फारसे कठीण जाणार नाही. प्लॅस्टिकच्या जाड पिशव्या व इतर प्लॅस्टिक गोळा करून रिसायकलिंग करणाऱ्या उद्योगाला कच्चा माल म्हणून पुरवणारे हिंदुस्थानात दहा लाख व्यक्ती साधारणपणे ऐंशी हजार टन प्लॅस्टिक रोज गोळा करून चार हजार पाचशे रिसायकलिंग करणाऱ्या कारखान्यांना पाठवतात, परंतु पातळ पिशव्या गोळा करून विकायच्या म्हटल्या तर साधारणपणे चार हजार सहाशे पिशव्या गोळा करून साफ करून विकायच्या म्हटल्या तर त्या जेमतेम एक किलो भरतात व त्याचे फक्त दोन रुपये मिळतात. त्यामुळे कोणीही त्या गोळा करत नाहीत. अशा पिशव्याच पर्यावरण व आरोग्यास त्रासदायक ठरू शकतात. यासाठी नागरिकांनी पातळ पिशव्या वापरणे पूर्णपणे बंद करावे. घरात अथवा दुकानात स्टॉक असेल तर तो कचरा वेचणाऱ्या व्यक्तींना द्यावा.

आरोग्य संवर्धन व पर्यावरण संरक्षण करायचे असेल तर प्लॅस्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रत्येक नागरिकाने सरकारला सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यांनी कापडी पिशव्या वापराव्यात. प्लॅस्टिकला पर्याय असणाऱ्या वस्तूंचा वापर करावा. सर्व सामाजिक संस्थांनी येत्या सहा महिन्यांत सार्वजनिक मैदाने, समुद्रकिनारे, नदीकिनारे, मोकळ्या जागा, रेल्वे, एसटी आदी ठिकाणी अनेक वर्षांपासून पडलेले प्लॅस्टिक गोळा करून आनंदवनसारख्या संस्थांना द्याव्यात. त्या संस्था त्याचा सदुपयोग करतील. असे झाले तर हिंदुस्थानातील कानाकोपरा प्लॅस्टिकमुक्त होईल व ते सर्वांच्या हिताचे ठरेल.