
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
साडे तीन दशकांपासून शिखविरोधी दंगलीतील पीडित न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. ज्या लोकांचा इतिहास हजारो शिख लोकांच्या निर्घृण हत्येने रंगलेला आहे त्याच लोकांनी दंगलीतील आरोपीला मुख्यमंत्री केले. अशा लोकांपासून पंजाबसह संपूर्ण देशातील नागरिकांना सावध राहण्याची आवश्यकता असल्याचा जोरदार हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला. पंजाबमधील गुरदासपूर येथे ते बोलत होते.
गुरदासपूर येथे आयोजित ‘पंतप्रधान धन्यवाद रॅली’मध्ये बोलताना मोदींनी 1984 ला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शिखविरोधी दंगलीवरून काँग्रेसला घेरले. देशाची सुरक्षा धोक्यात टाकणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
देशातील एका राजकीय पक्षाच्या इशाऱ्यावर आरोपीला ‘सज्जन’ दाखवून त्याविरोधातील फाईली दाबल्या जात होत्या, परंतु एनडीए सरकार सत्तेत आले आणि एसआयटी स्थापन केल्यानंतरचा परिणाम आज सर्वांसमोर आहे, असेही मोदी म्हणाले. नुकतेच शिखविरोधी दंगलप्रकरणी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना न्यायालयाने दोषी ठरवले होते, त्यावरून मोदींनी काँग्रेसची पिसे काढली.
PM Narendra Modi in Gurdaspur,Punjab: Ek parivaar ke ishaare par jin jin aaropiyon ko ‘sajjan’ bata kar file daba di gayi, NDA sarkar ne unko bahar nikala, SIT ka gathan kiya aur parinaam sabke saamne hai pic.twitter.com/MGNI3TfMKK
— ANI (@ANI) January 3, 2019
कर्जमाफीवरून साधला निशाणा
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. यावर टिका करताना मोदी म्हणाले की, काँग्रेसने अनेक वर्षांपासून मागणी होत असतानाही स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी मान्य केल्या नाहीत. तसेच शेतकऱ्यांची हमिभावाची मागणीही मान्य केली गेली नाही, फक्त खोटी आश्वासने दिली गेली. तसेच काँग्रेस काळात दिल्या गेलेल्या कर्जमाफीचे पितळ उघडे पडले आणि फक्त निवडक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याचे मोदी म्हणाले.




























































