
सामना प्रतिनिधी, नवी मुंबई
पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची जी राष्ट्रीय सुरक्षा बैठक बोलावली होती त्या बैठकीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह भाजपचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता याचा मी साक्षीदार आहे. कारण मीही त्या बैठकीला उपस्थित होतो, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केला. त्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसारच पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला. त्यामुळे त्याचे श्रेय उगाच कोणी लाटू नये, असेही पवार यांनी यावेळी भाजपला सुनावले.
कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक शाळेच्या मैदानावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बूथ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, मी इतकी वर्षे राजकारणात आहे, पण गेल्या साडेचार वर्षांसारखे दबावाचे राजकारण मी पाहिले नाही. एखाद्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून 10-10 तास बसवून ठेवले जात आहे. हे यापूर्वी कधीच घडत नव्हते. पोलिसांनो, तुम्हाला जे सल्ला देत आहेत त्यांचे जास्त ऐकू नका. कारण चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे असतात हे विसरू नका. सरकार येते आणि जाते, उगाच पुढे तुमची चौकशी लागायला नको, असाही सावधगिरीचा सल्ला त्यांनी पोलिसांना दिला.
























































